
12 एप्रिल 2004 या दिवशी ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये रचलेल्या वैयक्तिक 400 धावांच्या एव्हरेस्टवर अद्याप पुणीही चढाई करू शकला नाही. मात्र येणाऱया वर्षात हिंदुस्थानचे शुबमन गिल आणि यशस्वी जैसवाल हे दोन फलंदाज धावांच्या चारशेपार जातील, असा अंदाज ब्रायन लाराने वर्तवला आहे.
विंडीजच्या या स्टायलिश फलंदाजाने मॅथ्यू हेडनचा झिम्बाब्वेविरुद्ध केलेला 380 धावा विश्वविक्रम मोडीत काढताना नाबाद 400 धावा केल्या होत्या. तेव्हापासून गेली 20 वर्षे हा विक्रम अबाधित आहे. या विश्वविक्रमाला मोडण्यासाठी वीरेंद्र सेहवाग, सनथ जयसूर्या, इंझमाम उल हकसारख्या अनेक फलंदाजांनी प्रयत्न केले, पण ते यशस्वी ठरले नाहीत. मात्र गिल आणि जैसवालला चांगली परिस्थिती मिळाली तर ते चारशेपार जातील, असे लाराला वाटते. या दोघांप्रमाणेच इंग्लंडचे जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रुक हेसुद्धा आपला विक्रम मोडू शकतात. त्यांचा झंझावाती खेळ या विक्रमाच्या समीप जाऊ शकतो, असेही लारा म्हणाला. या चारही फलंदाजांना धावांची प्रचंड भूक असल्यामुळे ते चारशेपार पोहोचल्यानंतरही धावा ठोकत राहतील, असेही लारा म्हणाला.