हिंदुस्थानसाठी पाकिस्तान दूरच, चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनातही हायब्रीड मॉडेलची शक्यता

तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान मिळाले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) आनंदाचे वातावरण होते. त्यांनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाची जोरदार तयारीही सुरू केली आहे. मात्र या स्पर्धेनिमित्ताने हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी असल्यामुळे पीसीबीला जबर हादरा बसला आहे. ही स्पर्धाही गेल्या वर्षी आयोजित झालेल्या आशिया कपप्रमाणेच हायब्रीड मॉडेल असण्याचीच दाट शक्यता आहे आणि हिंदुस्थानचे सामने पाकिस्तान वगळून दुबई किंवा श्रीलंकेत खेळवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

गेले काही दिवस चॅम्पियन्स करंडक आयोजनाबाबत विविध बातम्या पसरवल्या जात होत्या की, हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळायला जाणार. याबाबत बीसीसीआयने आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नसल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळाल्यामुळे पाकिस्तानातील आणखी एक स्पर्धा अडचणीत आली आहे. पीसीबीने गेल्याच महिन्यात आयसीसीला स्पर्धेचा आराखडा दिला होता, ज्यात हिंदुस्थानचे सामने लाहोरमध्ये खेळवण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. यात हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याचाही समावेश होता. मात्र पीसीबीचा हा आराखडा बीसीसीआयच्या नकारानंतर केराच्या टोपलीत जाण्याची शक्यता आहे.

पीसीबी नव्हे, आयसीसीही पर्यायाच्या शोधात

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे आयसीसीने यासाठी दुसरा पर्याय शोधायला सुरुवातही केली आहे. गेल्या वर्षी आशिया कपसुद्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळविण्यात आला होता. आताही तोच पर्याय अमलात आणण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थानचा संघ लाहोरऐवजी दुबई किंवा श्रीलंकेत खेळण्याची मागणी करू शकतो, यादृष्टीने आयसीसीसुद्धा कामाला लागली आहे. पीसीबीने या स्पर्धेसाठी आपल्या कराची, लाहोर आणि रावळपिंडीच्या स्टेडियम्सचे नूतनीकरण सुरू केले आहे. या स्टेडियम्सच्या डागडुजीसाठी पीसीबीने 17 अब्ज रुपयांची तरतूदसुद्धा केली आहे.

पीसीबीचे सर्वस्व पणाला

पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्याही स्थितीत पाकिस्तानातच खेळवायची असा चंग बांधला आहे. त्यासाठी सुरू झालेली तयारी पाहता ते पूर्णपणे मैदानात उतरले आहेत. या महिन्याच्या अखेरीस कोलंबोत होणाऱया आयसीसीच्या एजीएममध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 1996 नंतर प्रथमच पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. गेल्या वर्षी त्यांनी आशिया कपच्या काही सामन्यांचे आयोजन पाकिस्तानात केले होते. हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळावा म्हणून पीसीबीने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. दोन्ही संघांत गेली 11 वर्षे कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांशी भिडतात. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्त न्यूयॉर्प येथे हिंदुस्थान-पाकिस्तानात साखळी सामना खेळला गेला होता, तर 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थान-पाकिस्तान अहमदाबादेत एकमेकांशी भिडले होते. 2017 च्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने हिंदुस्थानचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. पुन्हा एकदा पाकिस्तानी संघ आपले जेतेपद राखण्यासाठी स्पर्धेत उतरणार आहे.