
पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला स्टॉपेज टाईममध्ये बदली खेळाडू ओली वॉटकिन्सने केलेल्या गोलने युरो कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या इंग्लंडने नेदरलॅण्ड्सचे कडवे आव्हान 2-1 असे मोडीत काढले. आता रविवारी मध्यरात्री इंग्लंड आणि स्पेन यांच्यात युरो कपची अंतिम लढाई रंगेल.
इंग्लंडचे प्रशिक्षक जेरेथ साऊथगेट यांनी कर्णधार हॅरी केनच्या जागी 80 व्या मिनिटाला ओली वॉटकिन्सला खेळविण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि स्टॉपेज टाईमच्या पहिल्याच मिनिटाला वॉटकिन्सने गोल करत तो निर्णय खरा करून दाखवला. युरो कपच्या बाद फेरीतच इंग्लंडच्या ज्यूड बेलिंगहॅमने स्टॉपेज टाईममध्ये स्लोव्हाकियाशी बरोबरी साधणारा गोल केला होता. या सामन्यात स्लोव्हाकिया हरवले तर उपउपांत्य फेरीत स्वित्झर्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये धक्का देत इंग्लंडने आपले विजयी अभियान कायम राखले.
इंग्लंड प्रथमच परदेशात फायनल खेळणार
इंग्लंडचा संघ 1966 साली मायदेशातच जगज्जेता ठरला होता. त्यानंतर ते एकदाही त्याची पुनरावृत्ती करू शकले नाहीत. तसेच युरो कपमधेही ते गेल्या वेळी ते मायदेशातच अंतिम सामना खेळले होते, पण त्यांना इटलीकडून हार पत्करावी लागली होती. मात्र यावेळी ते परदेशात अंतिम सामना खेळणार आहेत जे याआधी कधीही घडले नव्हते.
इंग्लंडची खराब सुरुवात
इंग्लंडच्या खेळाची सुरुवात चांगली नव्हती. डच जावी सिमन्सने सातव्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यानंतर इंग्लंडने बरोबरी साधण्यास फार वेळ घेतला नाही. 18 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी का@र्नरवर कर्णधार हॅरी केनने गोल केला. पहिला हाफ 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱया हाफमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार चढाई केली. सामना अतिरिक्त वेळेत जाणार अशी चिन्हे असताना मैदानात उतरलेल्या वॉटकिन्सने पालमरकडून मिळालेल्या पासवर स्टॉपेज टाईमच्या पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी दवडली नाही. इंग्लंडचा संघ स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत असला तरी 1988 साली आपले पहिलेवहिले युरो कप जिंकणाऱया डच संघाची गेल्या 36 वर्षांची उपांत्य फेरीत हरण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. ते 1992, 2000, 2004 आणि आता असे चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचलेत आणि हरलेत. त्यांच्याइतका दुर्दैवी संघ दुसरा कोणताही नाही.
58 वर्षांनतर पुन्हा एकदा संधी
युरो कपमध्ये इंग्लंड हीरो व्हावा अशी जगभरातील फुटबॉलप्रेमींची मनापासून इच्छा आहे. कारण इंग्लंडचा संघ एकदाही युरो कप जिंपू शकलेला नाही. ते अकराव्यांदा युरो कप खेळत असले तरी ते केवळ तिसऱयांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवू शकले आहेत. गेल्या स्पर्धेत इटलीने इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळवले होते. युरो कपच्या इतिहास इंग्लंडचा संघ प्रथमच सलग दुसऱयांदा जेतेपदासाठी भिडणार आहे. 1960 पासून सुरू झालेल्या युरो कपमध्ये इंग्लंड आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे इंग्लंड आपल्या पहिल्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे तर स्पेन विक्रमी चौथ्या जेतेपदासाठी संघर्ष करील. दोघांपैकी पुणीही जिंकला तरी विक्रम हा होणारच आहे.