कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडवरून आसपासच्या परिसरात पसरणारी दुर्गंधी रोखण्यासाठी तातडीने उपाय योजण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला देण्यात येतील तसेच डंपिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्यासाठी अंबरनाथमध्ये 18 एकर जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे भूसंपादन झाल्यावर कांजूरमार्गचे डंपिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिले.
कांजूरमार्गमधील डंपिंग ग्राऊंडच्या समस्येच्या संदर्भात शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले की, मुंबईत एकमेव डंपिंग ग्राऊंड आहे तेही आमच्या मतदारसंघात आहे. संपूर्ण मुंबईचा कचरा कांजूरमार्गमध्ये टाकला जातो. त्यामुळे रोगराई पसरली आहे. प्रत्येक डॉक्टरकडे रांगा लागलेल्या असतात, दुर्गंधी पसरलेली आहे. कांजूर डंपिंग ग्राऊंड हायवेपासून फक्त 200 मीटरवर आहे. कांजूरमार्ग, मुलुंड, भांडुप, विक्रोळी या ठिकाणी या भागातील लोक स्थलांतर करण्याच्या मागे आहेत. खासकरून संध्याकाळच्या वेळेस प्रचंड दुर्गंधी पसरते. रहिवासी दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. मुंबईच्या बाहेर डंपिंग ग्राऊंड नेण्यासाठी काही मार्ग काढणार आहात का? दुर्गंधीवर काय उपाय योजणार आहात? डंपिंग ग्राऊंड लवकरात लवकर स्थलांतरित करणार का? कारण मागील अधिवेशनात यावर उत्तर देताना हे डंपिंग ग्राऊंड मुंबईच्या बाहेर हलवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे हे डंपिंग ग्राऊंड हलवणार असाल तर त्याचा अवधी किती असेल, असा सवाल सुनील राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सुनील प्रभू, आशीष शेलार, सुनील राणे यांनी भाग घेतला.
कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर नवीन पंत्राटदार नेमण्यात आलेला आहे. मुंबईतील 6 हजार 400 मेट्रिक टन कचऱयापैकी 5 हजार 800 मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. या डंपिंग ग्राऊंडवरून दुर्गंधी पसरू नये म्हणून पंत्राटदाराला सूचना पालिकेने दिलेल्या आहेत. यासंदर्भात पालिका आयुक्तांना पुढील आठवडय़ात बैठक घेण्याच्या सूचना तातडीने दिल्या जातील. दुर्गंधी थांबवण्याच्या संदर्भातील उपाययोजना करावी हे निर्देश दिले जातील. हायवेपासून 200 मीटरवर डंपिंग ग्राऊंड आहे त्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या जातील. या डंपिंग ग्राऊंडचे भविष्यातील नियोजन काय यावरही चर्चा करण्यात येईल. हे डंपिंग ग्राऊंड तातडीने पंधरा ते वीस दिवसांत हलवणे योग्य ठरणार नाही. दुर्गंधी येणाऱया नागरी वस्तीला त्रास होणार नाही त्याचा प्रतिबंध केला जाईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.