सामना अग्रलेख – मोदी-पुतीन-झेलेन्स्की; ते काय कुणाला घाबरतात?

देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. आर्थिक घडी साफ विस्कटून गेली आहे. अशा वेळी पंतप्रधानांचे बूड देशात स्थिर हवे, पण बुडाला विमानाचे पंख बसवून पंतप्रधान जगात उडत आहेत. मोदी यांनी जगभ्रमण केल्याने देशाला काय मिळाले? हा प्रश्नच आहे. मोदी यांनी एकदा चीनला जाऊन यायला हवे. चीनला जाऊन विश्वगुरूंनी आपली जमीन सोडवण्यासाठी चर्चा करावी. पुतीन, ऑस्ट्रिया, चान्सलर नेहमर हे काय घरचेच आहे. भारतात चिनी सैन्य घुसले आहे, म्हणून मोदींनी त्यांचे विमान चीनकडे वळवावे अशी एक माफक अपेक्षा आहे. मोदी हे शूर आहेत. ते काय कुणाला भितात?

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून पंतप्रधान मोदी हे विशेष विमान घेऊन देशाबाहेरच आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मणिपुरातील हिंसाचार पीडितांना भेटत आहेत. त्यांचे अश्रू पुसत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी हाथरस येथे जाऊन बुवाबाजीच्या चेंगराचेंगरीत बळी गेलेल्या नातेवाईकांची भेट घेतली. गांधी लगेच गुजरातलाही पोहोचले. देशातील समस्या आणि पीडितांचे दुःख विरोधी पक्षनेते समजून घेत असताना पंतप्रधान मोदी परदेश भ्रमणाला गेले आहेत. मोदी हे रशियात गेले व त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पाहुणचार घेतला. मोदी यांनी पुतीन यांना कडकडून मिठी मारली. यावर जगभरातून टीका होत आहे. रशिया व युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे व युक्रेनमध्ये लाखो लोकांचे बळी पुतीन यांनी घेतले. भारतातील अंधभक्तांनी वर्षभरापूर्वी अशी आवई उठवली की, ‘पापाने वॉर रुकवादी.’ म्हणजे मोदी यांनी मध्यस्थी केल्याने रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबले! जगात इतर कोणाला जमले नाही ते विश्वगुरू मोदी यांनी करून दाखवले, पण या सर्व लोणकढी थापाच होत्या. युद्ध सुरूच आहे. मोदी व पुतीन हे क्रेमलिन येथे चहापान करीत असतानाच रशियाने कीव येथे एका लहान मुलांच्या इस्पितळावर बॉम्ब टाकला. त्यात दोनशेवर लहान बालकांचा मृत्यू झाला. हे भयंकर आहे. या संहाराबद्दल ना पुतीन यांनी दुःख व्यक्त केले, ना पंतप्रधान मोदी यांनी हळहळ व्यक्त केली. तिकडे इस्राएल गाझापट्टीत असाच

विध्वंस आणि संहार

करीत आहे व इथे पुतीन यांनीही युक्रेनमध्ये मानवी रक्ताच्या नद्या वाहिल्या. मात्र जगातील सगळय़ात मोठय़ा लोकशाहीचे प्रमुख असलेले पंतप्रधान मोदी संहार करणाऱ्या नेत्यांना मिठय़ा मारीत आहेत. रशियावर जगाने बहिष्कार टाकला आहे, कारण पुतीन यांनी माणुसकी सोडली आहे. भारत हा मानवतेचा संदेश देणारा देश आहे. अशा वेळी मोदी यांनी देशाचे संस्कार पाळून संयम दाखवायला हवा होता. पण निवडणुका संपताच मोदी यांना परदेशगमनाची घाई झाली व ते रशियासह अनेक देशांत फिरायला गेले. पुतीन यांच्या देशातील लोकशाही पूर्णपणे संपली आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे अक्षरशः खून झाले आणि त्यामुळे संसदेत पुतीन यांनी एकतर्फी बहुमत मिळवले. रशियात आता फक्त पुतीनशाही आहे व एखाद्या बेफाम गुन्हेगारासारखे ते वागत आहेत. मोदी यांनी पुतीन यांना मिठी मारली तेव्हा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा नेता जगातील सर्वात मोठय़ा खुन्याला मिठी मारतो तेव्हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसतो.’ पुतीन यांनी युक्रेनच्या भूमीवर लाखो जिवांचे बळी घेतले. त्यामुळे झेलेन्स्की यांची वेदना समजून घेतली पाहिजे. मोदी हे पुतीन यांचा पाहुणचार आटोपून ऑस्ट्रिया येथे गेले. तेथे त्यांचे भारताचे पंतप्रधान म्हणून स्वागत झाले. ऑस्ट्रियात मोदी यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली. जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची म्हणजे शांततेची गरज आहे. युक्रेन-रशियाने चर्चेतून   शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. मोदी यांनी हे

शांततेचे प्रवचन

ऑस्ट्रियात पोहोचल्यावर दिले. रशियात असताना मोदी यांनी शांततेची कबुतरे उडवायची हिंमत पुतीनसमोर का दाखवली नाही? मोदी यांचे हे दुटप्पी वागणे देशात व परदेशात सारखेच आहे. देशात मोदी यांनी हिंदू-मुसलमानांतील हिंसाचाराला उत्तेजन दिले आहे. राजकीय फायद्यासाठी त्यांचे हे धोरण आहे, पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे हे धोरण त्यांच्यावरच उलटले. रशियात जाऊन मोदी यांनी शेखी मारली की, ‘भारतीय जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली.’ हे सपशेल खोटे आहे. जनतेने मोदी व त्यांच्या पक्षाला ठोकरले आहे. मोदी हे कुबडय़ा घेऊन जगात फिरत आहेत. देशात अनेक प्रश्नांचा आगडोंब उसळला आहे. कश्मीरात जवानांवर हल्ले सुरूच आहेत. बेरोजगारी, महागाईचा धुमाकूळ सुरू आहे. देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. आर्थिक घडी साफ विस्कटून गेली आहे. अशा वेळी पंतप्रधानांचे बूड देशात स्थिर हवे, पण बुडाला विमानाचे पंख बसवून पंतप्रधान जगात उडत आहेत. मोदी यांनी जगभ्रमण केल्याने देशाला काय मिळाले? हा प्रश्नच आहे. मोदी यांनी एकदा चीनला जाऊन यायला हवे. चीनचे सैन्य लडाखच्या हद्दीत घुसले आहे व आपल्या हजारो वर्ग मैल जमिनीचा ताबा चिन्यांनी घेतला आहे. चीनला जाऊन विश्वगुरूंनी आपली जमीन सोडवण्यासाठी चर्चा करावी. पुतीन, ऑस्ट्रिया, चान्सलर नेहमर हे काय घरचेच आहे. भारतात चिनी सैन्य घुसले आहे, म्हणून मोदींनी त्यांचे विमान चीनकडे वळवावे अशी एक माफक अपेक्षा आहे. मोदी हे शूर आहेत. ते काय कुणाला घाबरतात?