ठसा – सुरेंद्रभाऊ शंकरशेट

>> राजेश पोवळे

केवळ  घराण्याचे नाव सांगून चालत नाही, तर तो वारसा पुढच्या पिढीने जपायचा असतो. तो वृद्धिंगत करायचा असतो. आपल्या पूर्वजांचा वारसा नेटाने जपणारे नाव म्हणजे सुरेंद्र विनायकराव शंकरशेट. ज्यांनी आधुनिक मुंबई घडवली, ज्यांनी मुंबईत पहिल्या शाळा, पहिली महाविद्यालये, पहिले मेडिकल कॉलेज, पहिले रुग्णालय उभारले. इतकेच नव्हे तर ज्यांनी आशिया खंडात पहिली रेल्वे आणली ते थोर समाजपुरुष नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे सुरेंद्र शंकरशेट हे खापर पणतू. सुरेंद्रभाऊ वयाच्या नव्वदीत पदार्पण करत आहेत. मुंबईतील अत्यंत सधन आणि संपन्न कुटुंबात जन्मलेले आणि परदेशातून उच्च शिक्षण घेतलेले सुरेंद्रभाऊ हे घराण्याचा नावलौकिक द्विगुणित करत आजही सामाजिक कार्यात तरुणाला लाजवेल या तडफेने झोकून देत आहेत.

नाना शंकरशेट यांच्या ठाकूरद्वार येथील वाडय़ात 12 जुलै 1934 रोजी सुरेंद्रभाऊंचा जन्म झाला. आता तेथे शंकरशेट यांचा ऐतिहासिक वाडा नाही. पण त्याच्या अस्तित्वाचे सुरेंद्रभाऊ हे साक्षीदार आहेत. राष्ट्रपुरुष नाना शंकरशेट यांच्याकडून भाऊंना सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. नानांचे समाजहितैषी विधायक आणि कल्याणकारी कार्य हे भाऊंसमोर प्रेरणा म्हणून होते. मुंबई विद्यापीठातून फार्मसीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या लिड्स विद्यापीठातून बिझनेस स्टडीज आणि सेल्स मॅनेजमेंट या दोन अभ्यासक्रमात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. इंग्लंड आणि भारतातील बहुराष्ट्रीय औषध निर्मिती कंपन्यांमध्ये 33 वर्षे नोकरी करताना भाऊंनी समाजाशी असलेली नाळ मात्र तुटू दिली नाही. नाना शंकरशेट यांच्या सामाजिक सेवेचा वारसा पुढे न्यायचा आणि समाजकार्य करूनच त्यांचे ऋण फेडायचे अशी त्यांची नम्र भावना आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अंतरिक नाते होते. शिवसेनाप्रमुखांचे कार्य ही सुरेंद्रभाऊंची प्रेरणा आहे.

‘दैवज्ञ समाचार’ (1888) या सर्वात जुन्या ज्ञातीपत्राचे त्यांनी संपादकपद भूषवले. अखिल भारतीय दैसपचे ते उपाध्यक्ष आणि विश्वस्त खजिनदार होते. सर्वात जुन्या ज्ञाती फंडाचे ते विश्वस्त आहेत. परळ येथील वाघेश्वरी टेंपल ट्रस्ट येथे ते खजिनदार आहेत. नाना शंकरशेट यांचे आराध्य दैवत असलेल्या नाना चौक येथील भवानी शंकर मंदिराच्या ट्रस्टवर भाऊ संचालक मंडळावर आहेत. गिरगावातील नाना शंकरशेट सोनापूर स्मशानभूमीचे ते ट्रस्टी आणि खजिनदार आहेत. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक स्मारक समितीचे ते प्रमुख सल्लागार आहेत. गिरगाव चौपाटीचे लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ ‘स्वराज्यभूमी’ असे नामकरण करण्याच्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते. नाना शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या कमळाबाई हायस्कूलचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.

ज्या नाना शंकरशेट यांनी आधुनिक मुंबईचा कायापालट केला त्यांचे मुंबईत स्मारक असावे यासाठी सुरेंद्रभाऊ शंकरशेट यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांच्यासह नाना शंकरशेट प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेचे सुरेंद्रभाऊ हे अध्यक्ष आहेत. नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच मुंबई महापालिकेने नानांच्या स्मारकासाठी वडाळा येथे भूखंड मंजूर केला. या स्मारकासाठी विद्यमान सरकारनेही 31 कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच तेथे भव्यदिव्य स्मारक उभे राहील. नाना शंकरशेट यांनी मुंबईत शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या वाडय़ात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी स्थापन केलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर अशी क्रांतीकारक पिढी घडली. त्यामुळे नानांच्या या स्मारकातून आयएएस अधिकारी घडावेत असे शैक्षणिक संकुल उभारण्याचा संकल्प सुरेंद्रभाऊ, मनमोहन चोणकर आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानने सोडला आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे नामांतर व्हावे यासाठी नाना शंकरशेट प्रतिष्ठान व दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेने छेडलेल्या प्रत्येक आंदोलनात सुरेंद्रभाऊ याही वयात अग्रस्थानी असतात. शांत, संयमी, दुजाभाव न बाळगणारे आणि दुराग्रही नसणारे सुरेंद्रभाऊ मात्र अशा वेळी आक्रमक होतात आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाच्या खासदारांची, मंत्र्यांची भेट घेऊन मुंबई सेंट्रलच्या नामांतराचा मुद्दा प्रखरपणे मांडतात. या कार्यात त्यांना अॅड. मनमोहन चोणकर, दिनकर बायकेरीकर, दैसपचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, अॅड. सच्चिदानंद हाटकर, रवींद्र माहीमकर, चंद्रशेखर दाभोळकर, अश्विन उपाध्याय यांची साथसोबत आहे. त्यांच्या  या कार्यामुळेच त्यांना ‘समाजश्रेष्ठी’ हा किताब मिळाला आहे.

निसर्ग नियमामुळे शरीर थकते, पण मन नाही. सुरेंद्र शंकरशेट हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. अत्यंत सुखवस्तू कुटुंबात जन्म आणि आयुष्यात सुबत्ता, सौख्य असूनही समाज व जनहिताच्या अंतरिक ओढीने आजही सुरेंद्रभाऊ शंकरशेट त्याच तडफेने सामाजिक कार्य करीत आहेत.