
मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या वाटेत येणार नाही. पण दिलेला शब्द मोडलात तर मराठा वज्रमुठीची ताकद येत्या विधानसभेत तुम्हाला दिसेल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मिंधे सरकारला दिला. त्याचबरोबर मराठा समाजाने एकगठ्ठा मतदान करून आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बीडमध्ये आज मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून मिंधे सरकारला धारेवर धरले. आरक्षणाची लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे, तेव्हा मराठ्यांनी गाफील राहू नये. माझी कितीही चौकशी करू द्या. ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मी तसूभरही मागे हटणार नाही, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
गिरीश महाजन आंदोलन फोडे मंत्री
राज्यात कुठेही आंदोलन झाले की शिष्टाईसाठी गिरीश महाजन यांना पाठवले जाते. महाजन गेले की आंदोलन मोडते, त्यात फुट पडते. महाजन हे माणसाला फसवतात. ते आंदोलन फोडे मंत्री आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला. आपण खुप हुशार आहोत असा महाजन यांचा गोड समज आहे. पण मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे हे त्यांना आता कळले असा टोलाही जरांगे यांनी लगावला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे, उदय सामंत यांच्यावरही टीका केली.
किती आत्महत्या होऊ द्यायच्या?
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेकांनी बलिदान दिले आहे. अजून किती मराठ्यांनी आपले आयुष्य संपवायचे? किती मराठा माता भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसायचे? सरकारच्या कानावर मराठा समाजाचा आक्रोश पोहोचत नाही का? ज्या घरात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली आहे, त्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती आहे. एकदा हे अश्रु पुसण्याचे काम करा. मराठा समाजाचा केवळ मतांसाठी उपयोग करणे थांबवा असे मनोज जरांगे म्हणाले.