
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज निवळी येथे तब्बल 8 लाख 4 हजार 116 रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांनी संयुक्तरित्या केली.
एका बोलेरोमधून गुटख्याच्या साठ्याची वाहतूक होत होती. ही बोलेरो गाडी निवळी येथे अडवून त्याची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये गुटखा भरलेली पोती आढळून आली. पोत्यामध्ये विमल पान मसाला, व्हीवन सुगंधी तंबाखू, आरडी पान मसाला, एम सुगंधी तंबाखू अशा विविध कंपन्यांचे गुटखे होते. एकूण 8 लाख 4 हजार 116 रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. तसेच बोलेरो गाडी जप्त करण्यात आली. या कारवाईत संकेत शिवाजी चव्हाण, विशाल बळवंत घोरपडे आणि सुरज राजू साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर, अन्न व औषध प्रशासनाचे निरिक्षक दिनानाथ शिंदे, विजय पाचपुते आणि त्यांच्या पथकाने केली.