पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत येत आहेत. मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ममता बॅनर्जी या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मुकेश अंबानी आणि नीता अंबांनी यांनी आपल्याला अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. या लग्नसोहळ्याला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर आमची भेट होणार असून राजकीय मुद्द्यांवर चर्चा होईल. विशेष करून लोकसभा निवडणुकीनंतर ही भेट होत आहे. यासह शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. मुंबईला विमानाने रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.