मुंबईत BKC पोलीस स्टेशनवर काँग्रेसचा मोर्चा; स्मार्ट मीटर विरोधात मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारल्याने नेत्यांचा संताप

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईत आज मोठा मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील स्मार्ट मीटर रद्द करा… अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. मोर्चासाठी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी आपला मोर्चा बीकेसी पोलीस स्टेशनवरच काढला. अदानाली पाठिंबा देणाऱ्या सरकारने आमच्या गाड्या आडवल्या. कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा मुंबईकरांचा आवाज आहे. वीजदर कमी करा आणि स्मार्ट मीटर रद्द करा, अशी मागणी यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

मुंबईतील स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे. वाढलेल्या वीज बिलाविरोधात आम्ही मोर्चा काढणार होतो. पण उद्योगपतींना पाठिंबा देणारे या सरकारने आणि पोलीस यंत्रणेने मोर्चाला परवानगी नाकारली. विजेचे बिल कमी झाले पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत. राज्य सरकारला मध्यमवर्गीयांचा आवाज ऐकू येत नाही, अशी टीका यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली.

आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली नसून त्यांच्यामागे असलेल्या अदृश्य शक्तीचं हे काम आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. यासंबंधी आम्ही एक निवदेन देणार असून त्वरीत स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. तसेच मोर्चासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी यावेळी केला.