NEET-UG: धक्कादायक! महाराष्ट्र-बिहार-यूपी-ओडिशातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तराची भाषा गुजराती निवडण्यास सांगितली

NEET-UG संदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींनी गुजरातमधील गोध्रा येथील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या ओडिशा, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यातील अनेक NEET-UG विद्यार्थ्यांना परीक्षेची भाषा गुजराती निवडण्यास सांगितले होते , अशी माहिती नवीन माहिती समोर येत आहे.

परीक्षेला बसलेल्या गुजराती व्यक्तींना त्यांच्या उत्तरपत्रिका भरता याव्यात यासाठी हे करण्यात आलं होतं, अशी माहिती CBI ने गुजरात न्यायालयात सांगितली. अधिक चौकशीसाठी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी करताना CBI ने हा दावा केला आहे. इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त प्रिसद्ध केले आहे.

इतकेच नाही तर या उमेदवारांना पंचमहाल किंवा वडोदरा असा त्यांचा कायमचा पत्ता दाखवण्यास सांगण्यात आले होते. CBI NEET-UG मधील गैरव्यवहारांचा तपास करत आहे. तेव्हा दोन परीक्षा केंद्रांवरील कथित गैरप्रकारांच्या CBI च्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.

दोन्ही परीक्षा केंद्रांचे नियंत्रण एकाच ऑपरेटरकडे असल्याचे CBI ने म्हटले आहे. आरोपींनी वेगवेगळ्या लिंकद्वारे वेगवेगळ्या राज्यातील या सर्व उमेदवारांना संपर्क केला होता.

सीबीआयने 5 मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रांपैकी एक असलेल्या गोध्रा येथील जय जलाराम शाळेचा मालक दीक्षित पटेल यांच्यासह सहा आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दीक्षित पटेल याला 30 जून रोजी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर NEET-UG परीक्षा पास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपयांची मागणीही केल्याचा आरोप आहे.

गेल्या महिन्यात गुजरात पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता. आता एका मोठ्या कटाचा एक भाग म्हणून याप्रकरणातील ‘आंतरराज्यीय दुवे’ शोधण्याचं काम CBI करत आहे. त्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या CBI ने आतापर्यंत सहा एफआयआर नोंदवले असून या प्रकरणात 11 जणांना अटक केली आहे.

बिहारमध्ये नोंदवण्यात आलेली तक्रार पेपर फुटीशी संबंधित आहे, तर उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची बनवेगिरी आणि फसवणूकशी संबंधित आहेत.