ज्यांना मान दिला, त्यांनी घात केला! शरद पवारांची अजित पवार गटावर टीका, विधानसभेत 225 जागा जिंकण्याचा विश्वास

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात लोकांचा भरभक्कम पाठींबा मिळाला. फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या लोकांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यातील 288 जागांपैकी 225हून अधिक जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटावरही घणाघात चढवला.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शदर पवार म्हणाले की, महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी बदलाच्या दिशेने निर्णय दिला. महाराष्ट्रात 48 खासदार असून पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधकांचे फक्त 6 लोकं निवडून आली होती आणि त्यातील 4 राष्ट्रवादीचे होते.

केंद्रातील मोदींचे राज्य आणि महाराष्ट्रातील राज्य बघितल्यावर लोकं या निष्कर्षावर आले की राज्य बदलले पाहिजे. लोकांनी राज्य बदलण्याचा निर्णय घेतला आणि 48 पैकी 31 जागांवर विरोधी पक्षाला विजयी करत नवीन विचार रुजवला. राष्ट्रवादीच्याही 10 पैकी 8 जागा निवडून दिल्या. याचाच अर्थ ही सुरुवात आहे, असे शरद पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ते पुढे म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळी 288 जागांपैकी 225 हून अधिक जागा महाविकास आघाडीच्या येतील. महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची अपेक्षा असून या बदलासाठी तयार असणाऱ्यांना शक्ती, विश्वास देणे आणि त्यासाठी कष्ट करण्याची जबाबदारी आपली आहे. राज्य आणून त्यामार्फत लोकांच्या जीवनात फरक कसा होईल याची काळजीही आपण घेऊ. शेतकरी असो की शेतमजूर, उद्योजक असो की कर्मचारी, व्यावारी असो किंवा समाजातील कोणताही घटक असो, कोणत्याही जाती धर्माचा असो या सर्वांना घेऊन देशात एक शक्तीशाली व प्रगत असे राज्य आणण्याचा निर्धार करू, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

वारं फिरलंय! मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का; माजी मंत्री, माजी उपमहापौरांनंतर माजी आमदाराचा पक्षाला रामराम

अजित पवार गटाला टोला

ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला, त्या नेत्यांनीच आमचा घात केला, अशी जहरी टीकाही शरद पवार यांनी अजित पवार गटाचा उल्लेख न करता केली. उदगीर आणि देवळाली या दोन्ही ठिकाणी गेल्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. त्यांनी मतदारांचा घात केला. त्यांनी आता पक्ष बदलला, असा हल्लाबोलही पवार यांनी केला.

आमची रणनिती ठरलीय, ‘मविआ’चे तिन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील; संजय राऊत ठाम