
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठा फटका बसला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपची 240 चा आकडा गाठतानाही दमछाक झाली. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्यांच्या आधारांवर केंद्रात एनडीएचे सरकार उभे राहिले. आता लोकसभेनंतर अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात महाराष्ट्रासह हरियाणाचाही समावेश आहे. हरियाणामध्ये भाजपचीच सत्ता आहे, मात्र या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने इंडियन नॅशनल लोकदलशी (आयएनएलडी) आघाडी केली आहे.
बहुजन समाज पक्षाने गुरुवारी इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) सोबत आघाडीची घोषणा केली. मायावती यांचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांनी या नव्या आघाडीची घोषणा केली. तत्पूर्वी मायावती आणि अभय चौटाला यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आकाश आनंद यांनी दिली. तसेच हरियाणातील 90 पैकी 37 जागांवर बसपा, तर उर्वरित जागांवर आयएनएलडी निवडणूक लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Indian National Lok Dal (INLD) and the Bahujan Samaj Party (BSP) have announced to contest the upcoming Haryana Assembly elections together.
INLD leader Abhay Singh Chautala says, “Today the sentiment of the common man is that the BJP, which has been looting this state… pic.twitter.com/jlxyV69qyA
— ANI (@ANI) July 11, 2024
आकाश आनंद आणि अभय चौटाला यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभय चौटाला यांनी ही आघाडी वैयक्तीक स्वार्थासाठी नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या 10 वर्षात भाजपने राज्यात लूट केली असून आम्ही तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
2024च्या अखेरीस हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र तत्पूर्वी बसपा आणि आयएनएलडीच्या आघाडी झाल्याने भाजप आणि काँग्रेसची टेन्शन वाढले आहे. मायावतींना सोबत घेऊन दलित मतांचे गणित साधण्याचा प्रयत्न आयएनएलडीचा आहे. हरियाणामध्ये 20 टक्के जनता दलित आहे.
लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये बसपाला 1.28, तर आयएनएलडीला 1.74 टक्के मतं मिळाली होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आयएनएलडीला 2.44 मतं आणि एक जागा मिळाली होती, तर बसपाला 4.21 टक्के मतं मिळाला होते. गेल्या निवडणुकीत आयएनएलडीने अकाली दलासोबत संयुक्तपणे निवडणूक लढली होती. मात्र यंदा आयएनएलडीने मायावती यांच्या बसपाशी आघाडी केली आहे. 6 जुलै रोजी या संदर्भात अभय चौटाला यांनी मायावती यांची भेटही घेतली होती.
भारतीय जनता पक्ष ‘दलित विरोधी’ आहे, सातव्यांदा निवडून आलेल्या खासदाराचा घरचा आहेर