आमची रणनिती ठरलीय, ‘मविआ’चे तिन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील; संजय राऊत ठाम

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारी 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मुळे स्वगृही परतण्याचे वेध लागलेल्या आमदारांची मते विधान परिषदेत कोणत्या 11 उमेदवारांना मिळणार आणि कोणाचे बारा वाजणार हे 12 जुलैलाच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. ग्रामीण भागातील काही आमदार मुंबईत पोहोचलेले नाहीत. ते आज पोहोचतील, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव हे महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत. आम्ही जी रणनिती बनवली आहे त्यानुसार तिन्ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीत वाजणार का बारा? फुटाफुटी आणि क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने महायुतीला टेन्शन

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप 170 जागा लढणार असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता राऊत यांनी तो त्या तीन पक्षातील विषय असल्याचे म्हटले. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून जागावाटप करणार असून त्यात कोणताही ताणतणाव नसेल याची खात्री राऊत यांनी दिली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय, चिरडून मरतेय! राऊतांचा संताप; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर बरसले