VIP दर्शन: भुमरेंपाठोपाठ सामंतांचा नंबर, अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी दिलं पत्र, वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

विठुरायाचा धावा करत शेकडो मैलांचे अंतर चालत येऊन 10-12 तास दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांच्या मागे लागलेले मिंध्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव नाही. बुधवारी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी व्हीआयपी दर्शनासाठी घातलेला गोंधळ शांत होत नाही तोच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची चिठ्ठी घेऊन वशिल्याची लोकं मंदिर समितीच्या दारात उभी राहिली. यामुळे वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यभरातील लोकप्रतिनिधींनी खिरापत वाटावी तशी शिफारस पत्रे कार्यकर्त्यांना दिली असून ही तथाकथित मंडळी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिनी मंदिराच्या कार्यालयात शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी करताना दिसत आहेत. बुधवारी भुमरेंचा कारनामा जगजाहीर झाल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील सेवक नितीन सवडकर हे 7 व्यक्तींना सोबत घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या दर्शनाची प्राधान्याने ‘व्यवस्था’ करावी अशा आशयाचे पत्र उदय सामंत यांच्या सही-शिक्क्यानिशी प्राप्त झाले आहे.

आषाढी वारीच्या सोहळ्याला 15 लाखांपेक्षा अधिक वारकरी भाविक पंढरीत येत असतात. प्रत्येकाला आषाढी एकादशीच्या शुभ दिनी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडावे अशी आस असते. त्यासाठी लाखो भाविक दर्शन रांगेत उभे असतात. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना देवाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी तीस ते चाळीस तास लागतात. ऊन, वारा, पाऊस आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत कुठेही न बसता हे भाविक देवाचा धावा करीत उभे असतात. या भाविकांच्या श्रध्देचा, शारीरिक आणि मानसिक त्रासाचा कसलाही विचार न करता राजकीय नेते मंडळी व्हीआयपी दर्शनासाठी आग्रह करताना दिसतात.

वारीच्या काळात मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना शेकडो फोन हे व्हीआयपी दर्शन घडवा यासाठी येत असतात, त्यामुळे अधिकारी फोन बंद ठेवतात. चिठ्ठ्या चपाट्या आणि मेल याची तर गिनिती होणार नाही. या सगळ्या त्रासाला कंटाळून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र खासदार भूमरेनी गोंधळ घालून निर्णयाला मोडता घातला.

दर्शन रांगेत वयोवृध्द भाविकांची संख्या अधिक असते. अगदी सत्तर, ऐशी, नव्वद वर्षाचे वारकरी दिसून येतात. या भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन देण्याचे काम शासनकर्ते म्हणून उदय सामंत यांचे आहे. हे कर्तव्य सोडून दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येत अधिकची भर टाकण्याचे काम सामंत करीत आहेत.

Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा

गोरगरीब वारकऱ्यांवर अन्याय करु नका, अन्यथा..

विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल राज्यकर्त्यांचा सावळा कारभार डोळे उघडे ठेवून बघतो आहे. राज्याचे मंत्री म्हणून सामंत यांची जबाबदारी आहे. भाविकांना सेवासुविधा देण्याची, आणि हे मंत्री महोदय भाविकांच्या त्रासात भर टाकण्याचे काम करीत आहेत. ही बाब निंदनीय आहे. मंत्री महोदय माणुसकीचे भान ठेवा, सत्ता आहे म्हणून तुम्ही गोरगरीब भाविकांवर अन्याय करणार असाल तर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे यांनी दिला आहे.