ENG vs WI : 4 चेंडूत 3 विकेट्स, जेम्स अँडरसनच्या फेअरवेल सामन्यात लक्ष वेधणारा गस एटकिंसन कोण आहे?

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर सुरू आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. कसोटीत 701 विकेट्स घेणाऱ्या अँडरसनच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. मात्र या लढतीचा पहिला दिवस पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या गस एटकिंसन याने गाजवला. पहिल्याच डावात त्याने 7 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले. गस एटकिंसन याच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर यजमान संघाने पाहुण्यांना 121 धावांमध्ये गुंडाळले.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसन आणि क्रिस वोक्स या जोडीने गोलंदाजीची सुरुवात केली, मात्र पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या गस एटकिंसन याने विंडीजच्या डावाला सुरुंग लावला. त्याने 12 षटकात 45 धावा देत विंडीजचे 7 मोहरे टिपले. तर अँडरसन, वोक्स आणि स्टोक्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

इंग्लंडकडून पदार्पणात सर्वात्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये गस एटकिंसन याची वर्णी लागली आहे. त्याने 48 वर्षांपूर्वी जॉन लीवर यांनी हिंदुस्थानविरुद्ध केलेला विक्रम मोडला आहे. या यादीत जॉन फेरीस पहिल्या, तर डॉमिनिक कॉर्क दुसऱ्या स्थानावर आहेत.

इंग्लंडकडून पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणारे गोलंदाज

जॉन फेरिस – 1892 ला केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत जॉनी फेरिस यांनी 37 धावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडकडून पदार्पणातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 132 वर्षानंतरही हा विक्रम कायम आहे.

डॉमिनिक कॉर्क – 1995 ला लॉर्डसवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत कॉर्क यांनी 43 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या होत्या.

गस एटकिंसन – 2024 ला लॉर्डसवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतान गस एटकिंसन याने 45 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या. त्याने जॉन लीवर यांचा विक्रम मोडला. लीवर यांनी 1976 ला हिंदुस्थानविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत 46 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या होत्या.

4 चेंडूत 3 विकेट्स

पहिल्या स्पेलपासून गस एटकिंसन याने आग ओकायला सुरुवात केली. दुसऱ्याच चेंडूवर त्याने एलिक अथानाज याला बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने जेसन होल्डरला हॅरी ब्रूककरवी झेलपाद केले. जोशुआ दा सिल्वा याने एटकिंसन याची हॅटट्रिक होऊ दिली नाही. मात्र पुढच्याच चेंडूवर त्याने तो विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाला.

कोण आहे गस एटकिंसन?

गस एटकिंसन याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पहिली विकेट अॅलिस्टर कूक याची घेतली होती. काऊंटी क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर ‘द हंड्रेड’मध्येही एटकिंसन याने 140 किलोमीटर प्रति वेगाने गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. मात्र दुखापतींमुळे त्याला इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र हार न मानता एटकिंसन याने प्रयत्न सुरुच ठेवले आणि अखेर त्याला संधी मिळालीच. अँडरसनच्या निवृत्तीनंतर तो आर्चरसह इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारवड बनेल असा विश्वास इंग्लंडच्या निवड समितीला आहे. त्याने इंग्लंडकडून आतापर्यंत 9 वन डे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. वन डेमध्ये त्याच्या नावावर 11, तर टी-20मध्ये 6 विकेट्सची नोंद आहे.