मोदींनी जगातील सर्वात मोठय़ा गुन्हेगाराला मिठी मारली, हा शांततेच्या प्रयत्नांवर आघात! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची वेदना

रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्लादिमीर पुतीन आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा नेता जगातील सर्वात मोठय़ा खुन्याला मिठी मारतो तेव्हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसतो, अशी वेदना झेलेन्स्की यांनी व्यक्त केली.

पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध लादले आणि त्यातून हजारो निष्पापांचे बळी आजही जात आहेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. अशावेळी रशिया दौऱ्यावर गेलेल्या मोदी यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. ‘वॉर रूकवा दी’ जाहिरातबाजी करणाऱ्या मोदी यांनी प्रत्यक्षात रशियाला खडेबोल न सुनावता पुतीन यांची गळाभेट घेऊन युरोपीय देशांची नाराजी ओढवून घेतल्याचे जाणकारांचे मत आहे.

युरोपियन संघाचीही नाराजी ओढवली

युद्धखोर रशियाचा दौरा करून पुतीन यांना मिठय़ा मारणे यातून आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अपरिपक्वता दिसून येते. या कृतीतून मोदींनी संपूर्ण युरोपीय संघाशी वाकडेपणा घेतला आहे. युद्ध थांबवा असे मोदींनी बजावून सांगायला हवे होते, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांतून व्यक्त केली गेली.

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा नेता जगातील सर्वात मोठय़ा खुन्याला, सर्वात मोठय़ा गुन्हेगाराला मिठी मारतो तेव्हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसतो. मोदींच्या या गळाभेटीने आमची घोर निराशा झाली आहे.

– वोलोदिमीर झेलेन्स्की