आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे खास असल्याने फडणवीस गप्प आहेत का? प्रदीप नाखवा यांचा संतप्त सवाल

‘माझी मुलगी तिच्या आईसाठी टाहो पह्डते आहे, तिला तिची आई हवीय. मी कुठून आणून देऊ तिला आई?, असा आर्त सवाल करतानाच इतक्या क्रूरपणे माझ्या निष्पाप पत्नीला गाडीखाली चिरडण्यात आले असताना ज्यांच्या हातात कायदा-सुव्यवस्था आहे ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?, आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने ते गप्प आहेत का, असा प्रश्न विचारत नाखवा यांनी संताप व्यक्त केला.

आरोपीला वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून लपवून ठेवण्यात आले. तीन दिवसांनंतरच आरोपी पोलिसांना सापडला. आता तीन दिवसांनंतर आरोपीच्या शरीरात दारू किंवा अमली पदार्थांचा अंश सापडणार नाही. त्याला अटक झाली तरी नंतर जामीन मिळेल. मग खटल्याची सुनावणी सुरू होईल ती महिनोन् महिने सुरू राहील. काही काळाने हे सर्व प्रकरण शांत होईल. आमच्यासाठी कोण पुढे येणार आहे? आरोपीचा पिता हा एका मोठय़ा नेत्याचा जवळचा माणूस आहे. त्यामुळे तो सर्व काही खरेदी करू शकतो. अशा वेळी मला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मदतीला येणार आहेत का, असा सवाल प्रदीप नाखवा यांनी केला.

मुख्यमंत्री साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीला फरफटत नेऊन मारले आहे!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ढोल बडवत आहेत की, हे गरीबांचे राज्य आहे. पण मला दाखवा कुठे आहे गरीबांचे राज्य? मुख्यमंत्र्यांनी ‘लाडकी बहीण’ योजना काढली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीला फरफटत नेऊन मारले आहे. माझ्यासमोर फरफटत नेऊन मारले आहे आणि सांगितले जात आहे आरोपी गाडी रिव्हर्स घेत होता. आरोपीने जर गाडी रिव्हर्स घेतली असती तर माझी बायको वाचली असती, असा टाहो प्रदीप नाखवा यांनी पह्डला.

आरोपीला फासावर लटकताना मला पाहायचे आहे

कोणत्याही परिस्थितीत मला आणि माझ्या आईला न्याय हवा आहे. ज्या पद्धतीने आरोपीने माझ्या आईला गाडीखाली चिरडले आहे त्यामुळे आईला खूप वेदना झाल्या आहेत. मी तिला रुग्णालयात पाहिले तेव्हा तिची अवस्था अगदी वाईट होती. त्याला फासावर लटकताना मला पाहायचे आहे, अशी संतप्त भावना प्रदीप नाखवा यांची मुलगी अमृता हिने व्यक्त केली.

आम्हाला ते कचरा समजतात

n गरीबांचे राज्य म्हणणारे राज्यकर्ते घटनेनंतर अजूनही आम्हाला भेटायला आले नाहीत. आमच्या वेदना ऐकून घ्याव्या असे त्यांना वाटले नाही. त्यांच्यासाठी मतांचे राजकारण सर्व काही आहे. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसे म्हणजे त्यांच्यासाठी कचरा आहे, असा संताप व्यक्त करत प्रदीप नाखवा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उदासीनतेवर जोरदार प्रहार केला.

n आरोपी मिहीर शहा याला अटक झाली खरी, पण त्याला शिक्षा होण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत असल्याचा आरोप प्रदीप नाखवा यांनी केला. ते म्हणाले, ‘आरोपी जर दारुडा नव्हता, त्याने ड्रग्ज घेतले नव्हते तर तो लपलाच का? आणि दोन दिवस फरार का होता? दोन दिवसांनंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली तर त्यात दारू किंवा ड्रग्जचा अंश सापडेल का, असा सवाल प्रदीप नाखवा यांनी केला.

नागरिकांचा सवाल

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणाच्या विदारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्वांसमोर का येत नाही? पोलिसांकडून ते दडवले का जात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे.

पुण्यात पोर्शे कार आणि नागपूरमधील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज  प्रसिद्ध झाले. मग वरळी अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज सर्वांसमोर का येत नाही? कुणाच्या सांगण्यावरून अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज दाबले जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. धनिकपुत्र पब आणि बारमध्ये पाटर्य़ा करून बेदरकारपणे वाहने चालवतात आणि निष्पाप लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज जाहीर करून हा अमानुषपणा सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेच पाहिजे, अशी मागणी केली.

शिंदे गटाचा उपनेता राजेश शहा याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून कावेरी यांना फरफटत नेले. अपघात नेत्याच्या मुलाने केल्याने पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात आहे. प्रकरण वरच्या लेव्हलचे आहे. वरिष्ठ पातळीवर त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही, असे अधिकारी-कर्मचारी सांगतात.

नातेवाईकांना ताब्यात घेताच तो सापडला!

रविवारी पहाटे अपघात करून पळालेला मिहीर शहा तब्बल 60 तासांनंतर पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेने शहापूरमध्ये आई, बहिणींना ताब्यात घेतल्यानंतर मिहीर लगेच सापडला. पोलिसांची दहाहून अधिक पथके मिहीरचा शोध घेत होती. इतरवेळी एखाद्या गुह्यात कुठलाच सुगावा नसताना पळून गेलेल्या आरोपीला लीलया पकडणाऱया पोलिसांना मिहीर कुठे जाऊन लपलाय तेच समजत नव्हते. मिहीर सराईत गुन्हेगार नाही. शिवाय त्याला पळून जाण्यास सांगणारा त्याचा बाप पोलिसांच्या ताब्यात होता तरीही पोलिसांना मिहीरचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, मिहीर 60 तासांनंतर पोलिसांना विरारमध्ये सापडला. त्याआधी मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने शहापूर येथे मिहीरचे कुटुंबीय होते त्या रिसॉर्टमध्ये धडक दिली. त्यानंतर मिहीरच्या मित्राने लगेच राजेशला कॉल करून गुन्हे शाखेचे पथक पकडायला आल्याचे सांगितले. तिथेच मिहीरचा माग लागला आणि काही वेळातच तो विरार येथे पकडला गेला.

येऊरमध्येही मुक्काम

गोरेगाव येथून निघाल्यावर मिहीर, त्याची आई व बहिणी ठाण्यात गेल्या. येऊर येथे ते एक दिवस लपून राहिले. तेथून मग दुसऱया दिवशी ते सर्व शहापूरला पळाले. शहापूरला शहा यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या रिसॉर्टमध्ये ते थांबले होते, असेही सांगण्यात येते.

मिहीरच्या तीन मित्रांचे जबाब नोदवले

वरळी हिट अँड रन प्रकरणात आणखी माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री मिहीरच्या मित्राने विस ग्लोबल तपस बारमध्ये बुकिंग केले होते. तर बारमधील बिल हे मिहीरने त्याच्या कार्डने पेड केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिहीरच्या तीन मित्रांचा जबाब नोंदवला आहे.