मिहीरने सहआरोपींच्या मदतीने पळ काढला! पुराव्यांची विल्हेवाट लावली, पोलिसांचा न्यायालयात दावा

वरळी ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणातील आरोपी, मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाचे क्रूर कृत्य झाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. त्याने सहआरोपींच्या मदतीने घटनास्थळावरून पळ काढला आणि पुराव्यांची विल्हेवाट लावली. फरार असताना केस-दाढी कापून ओळख लपवण्याचाही प्रयत्न केला, असा दावा पोलिसांनी शिवडी न्यायालयात केला.

60 तास मोकाट राहिलेल्या मिहीर शहाला मंगळवारी अटक करण्यात आली आणि बुधवारी दुपारी पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले होते. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी बराच तपास बाकी असल्याचे सांगून मिहीरला जास्तीत जास्त कोठडी सुनावण्याची विनंती केली. मिहीर हा सहआरोपींच्या मदतीने घटनास्थळावरून पळून गेला. त्याने गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबर प्लेटची विल्हेवाट कुठे लावली? फरार होऊन कोणाकोणाला संपर्क केला? पुरावे कशा प्रकारे नष्ट केले? त्याला फरार होण्यासाठी सहआरोपीशिवाय आणखी कोणी मदत केली? याचा अधिक तपास करायचा आहे. मिहीरने ओळख लपवण्यासाठी केस व दाढी कापून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने कुठल्या सलूनमध्ये केस-दाढी कापली? यामागे त्रयस्थ व्यक्तींचा हात आहे का? मिहीरकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? तो चालवत असलेली कार कोणाच्या नावावर आहे? हेदेखील उघड झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ते कुठल्याही थराला जाऊ शकतात!

पोलिसांतर्फे सरकारी वकील रवींद्र पाटील यांनी बाजू मांडली. हा गंभीर गुन्हा असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न मिहीरने केला आहे. त्यामुळे अधिक तपास करण्यासाठी मिहीरला जास्तीत जास्त कोठडी द्या, अशी विनंती अॅड. पाटील यांनी केली. तसेच एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपीला सहानुभूती मिळावी यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असा दावा त्यांनी न्यायालयात केला.

आरोपीला अटकेचे कारण सांगितलेले नाही;मिहीरच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

पोलिसांच्या दाव्यावर मिहीरच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपीला त्याच्या अटकेबाबत कारणाची माहिती देणे आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी मिहीरला त्याच्या अटकेचे कारण सांगितलेले नाही, असा अजब युक्तिवाद करीत मिहीरच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला.

तळेगावात हिट अँड रन; महिलेचा मृत्यू

पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील विविध शहरात सुरू असलेले हिट अँड रनचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. तळेगाव-चाकण मार्गावर अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. महिलेला चिरडून वाहन चालक वाहनासह पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 9) पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या समोर घडली.

आशा नंदकुमार शिवले (वय 59) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयूर आनंद दाभाडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.