सतेज करंडक 71वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ‘कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक 71वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा’ या स्पर्धा 15 ते 20 जुलै या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलनातील बॅटमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड चाचणी पार पडली असून त्यापैकी 102 महिला व 152 पुरुष खेळाडूंची निवड करून पुरुषांचे 8 संघ, तर महिलांचे 6 संघ तयार करण्यात आले आहेत.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आता 31 संघ खेळणार
वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेले 25 जिह्यांचे महिला व पुरुष संघ खेळणार आहेत. तसेच ‘अ’ व ‘ब’ दर्जा प्राप्त महानगरपालिका हद्दीतील ठाणे जिल्हा शहर व ग्रामीण, मुंबई शहर मध्य व पश्चिम, मुंबई उपनगर मध्य व पश्चिम, नाशिक जिल्हा शहर व ग्रामीण, पुणे जिल्हा शहर व ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर असे एकूण 31 संघ या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत.
या अगोदरच्या कालावधीमध्ये पुणे जिह्यातून पुरुष 12 व महिला 12 खेळाडू स्पर्धेत सहभागी होत होते; परंतु महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नवीन धोरणानुसार आता पुणे जिह्यातून पुरुष 36 व महिला 36 खेळाडू या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुणे शहर विभागातून महिला 12 व पुरुष 12, पिंपरी-चिंचवड शहरातून महिला 12 व पुरुष 12 तसेच पुणे ग्रामीणमधून महिला 12 व पुरुष 12 इत्यादी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.