टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे एकत्रित भन्नाट मिश्रण करून तयार झालेला पिकलबॉल आज हिंदुस्थानात झपाटय़ाने पसरतोय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या खेळाला चांगली लोकप्रियता मिळू लागलीय. या सुसाट आणि भन्नाट हिंदुस्थानी खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कृषांग स्पोर्ट्सने रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅप अहवालाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
पिकलबॉलच्या विकासासाठी कृषांग स्पोर्ट्सने सर्वार्थाने पुढाकार घेतला असून त्यासाठी खेळाचा प्रचार कसा करायचा, हा खेळ हिंदुस्थानच्या शहरांमध्येच नव्हे तर खेडय़ापाडय़ांमध्ये कसा पोहोचवला जाऊ शकतो, पिकलबॉलबाबत लोकांमध्ये कशा प्रकारे उत्सुकता निर्माण केली जाऊ शकते, शालेय विद्यार्थ्यांना या खेळाकडे आकर्षित कसे केले जाऊ शकते अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या अहवालात मांडण्यात आला आहे. यासाठी कृषांग स्पोर्ट्सचे संस्थापक मेहुल रावल यांनी अथक परिश्रम घेत हा अहवाल रचला आहे. हा अहवाल पिकलबॉलसाठी जादूची कांडी ठरेल आणि राज्य-जिल्हा संघटनांना-खेळाडूंना त्याचा फायदा होईल, असा विश्वास मेहुल रावल यांनी बोलून दाखवला.
पिकलबॉलच्या विकासासाठी तयार केलेल्या आराखडय़ाने विदर्भ पिकलबॉल श्रेयांश मोहता चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यांनी या अहवालामुळे खेळाचा विकास होणारच, पण त्याबरोबर या खेळाविषयी असलेले सामान्य ज्ञानही लोकांपर्यंत पोहोचेल. काहीसा ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या बाबतीत मागे असलेल्या या खेळाला ग्लॅमरस करण्यासाठी हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, आयआयएसएमचे संस्थापक संचालक नीलेश कुलकर्णी, आमदार अॅड. पराग अळवणी, प्रबोधनकार क्रीडा संकुलाचे विश्वस्त राजू रावल, मकरंद येडुरकर आणि संकुलाचे व आंतरराष्ट्रीय पिकलबॉल महासंघाचे अध्यक्ष अरविंद प्रभू या दिग्गजांच्या उपस्थितीत पिकलबॉलच्या पहिल्यावहिल्या अहवालाचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले.