आभाळमाया – स्टारलायनरचे भवितव्य?

>> वैश्विक,  [email protected]

अवकाशी  सफर करण्याच्या आणि ती घडवून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीच्या गतीला गेल्या काही वर्षांत प्रचंड वेग आलाय. पूर्वी अमेरिकेतून फक्त नासा संस्था अंतराळ याने मोठय़ा प्रमाणावर सोडायची. आता अनेक देश त्यात उतरलेत आणि उद्याचा हिंदुस्थानही त्यात मागे नसेल. कारण हा एक किफायतशीर व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिले जाते. विविध देशांतील सरकारे आपल्या स्वतःच्या खर्चाने याने सोडण्याचा उपक्रम राबवत होती. यापुढे त्यात स्पेसएक्स, बोइंग अशा अनेक खासगी कंपन्या उतरलेल्या दिसतील.

त्यांचा उद्देश एकच आहे. पृथ्वीवरून अंतराळात वारंवार जाऊन परतणाऱ्या यानांची निर्मिती करून केव्हातरी सर्वसामान्यांनाही किमान अंतराळ सफर घडविणे. जमल्यास चंद्रावर घेऊन जाणे. ‘मंगळवारी’ साधली तर सोन्याहून पिवळे! अशा या महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणायच्या तर प्रचंड निधी खर्च करण्याची क्षमता हवी. ती अब्जाधीश उद्योजकांकडेच असणार. एलॉन मस्क यांचा व्यवसाय तुलनेने नवा असला तरी ‘स्पेसक्राफ्ट’ बनवण्याच्या उद्योगात त्यांनी बरीच आघाडी घेतलीय.

मग जगातली सर्वात व्यापक एअरक्राफ्ट आणि एअरोस्पेस कंपनी असलेली ‘बोइंग’ मागे कशी राहील? विल्यम एडवर्ड यांनी 1909 मध्ये संकल्पित केलेल्या या कंपनीचे पहिले विमान 15 जून 1916 रोजी उडाले. ते राइट बंधूंच्या ‘फ्लायर’सारखेच होते. आता मात्र त्यांनी 5 जून 2024 रोजी ‘स्टारलायनर’ या त्यांच्या दुसऱ्या ‘स्पेसक्राफ्ट’चं यशस्वी उड्डाण केले. 108 वर्षांनी बोइंगचा आकाश ते अवकाश असा यशस्वी प्रवास झाला. त्यांच्या ‘स्पेस कॅप्सूल’चे नाव आहे ‘स्टारलायनर.’ स्पेस कॅप्सूलच्या पहिल्या प्रयोगाला यश आले नाही. त्यात अंतराळयात्री नव्हते. 5 जून 2024 रोजी मात्र बॅरी ‘बूच’ विल्मोर आणि सुनीता विल्यम्स ऊर्फ ‘स्युनी’ यांना घेऊन बोइंगचे स्टारलायनर यशस्वीरीत्या अंतराळात पोहोचले.

या क्रू-फ्लाइट टेस्टसाठी निवड झालेली सुनीता विल्यम्स ही जगप्रसिद्ध अंतराळयात्री आहे. या स्टारलायनरची ही एक सदस्य. दुसरे बूच विल्मोर. अमेरिकेतील केप कार्निवल येथून या अंतराळयात्रींनी अवकाशात कार्यरत असलेल्या स्पेस स्टेशनवर म्हणजेच अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. या स्पेस स्टेशनविषयी सांगायचे तर 20 नोव्हेंबर 1998 रोजी अवकाशात स्थिरावलेली ही एक प्रकारची अवकाशी प्रयोगशाळा गेली 25 वर्षे कार्यरत आहे. त्यावर अनेक देशांचे अंतराळयात्री राहून जातात. सध्या तिथे सात स्थिर अंतराळयात्री असून गेल्या 6 जूनपासून सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे पाहुणे यात्री आहेत. या स्पेस स्टेशनचे वजन 4 लाख 50 हजार किलो इतके प्रचंड असून त्याची लांबी 109 मीटर आहे. त्याला सातत्याने ऊर्जा पुरवण्यासाठी 73 फुटांचे सोलार अॅरे किंवा पंख आहेत. पृथ्वीपासून अंतराळात ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. ते पृथ्वीच्या जवळ असते तेव्हा 413 किलोमीटर, तर दूर गेल्यावर 422 किलोमीटर अंतरावर असते.

एरवी हे अंतर पृथ्वीवर फार वाटणार नाही, पण ते निर्वात किंवा अत्यल्पवात असणाऱ्या जवळपास शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या अंतराळात भिरभिरतेय हे लक्षात घेतले तर त्याचे महत्त्वही समजेल. सेकंदाला 7.67 किलोमीटर किंवा सुमारे 8 किलोमीटर वेगाने परिक्रमा करणारे हे अंतराळ स्थानक 93 मिनिटांत पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करते. साधारण नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये ते संध्याकाळच्या आकाशात तेजस्वी ठिपक्यासारखे सरकताना नुसत्या डोळय़ांनीही दिसते. आम्ही ते अनेकदा अनुभवलेय. 5 जुलैला हा लेख लिहिला तेव्हा त्याला अंतराळात 25 वर्षे 7 महिने आणि 44 दिवस झाले होते. आता त्यात आजच्या तारखेपर्यंत दिवस मिळवा म्हणजे त्याचे नेमके अंतराळी वास्तव्य समजेल. जगातील पाच देशांच्या स्पेस एजन्सींनी ते बनवले आहे, हे विशेष! रशियाचे रॉस आणि अमेरिकेचे युसॉस या दोन यानांची यशस्वी जुळणी करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निर्माण झाले आहे. हे सगळे आता सांगण्याचे कारण म्हणजे बूच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना घेऊन गेलेले स्टारलायनर आठ दिवसांत किंवा त्याआधीच पृथ्वीवर परत आणण्याची योजना होती. त्यामुळे अंतराळात माणसे पाठवून ती वेळेत पृथ्वीवर परत येऊ शकतात हे सिद्ध झाले असते आणि स्पेस टूरच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असते. परंतु बूच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या स्पेस स्टेशनवर सोडल्यावर स्टारलायनरच्या थ्रस्टर किंवा अंतराळ यानाला पुढे वा मागे नेणाऱ्या बूस्टर यंत्रणेत काहीतरी घोळ झाला. त्यामुळे हे दोन अंतराळयात्री स्पेस स्टेशनवर सुखरूप असले तरी ते तिथे किती काळ राहणार? स्टारलायनर त्यांना सुखरूप परत आणण्याच्या स्थितीत आहे की नाही?

आता नासा म्हणतेय की, 45 दिवस स्टारलायनर अवकाशात राहू शकते. त्याची दुरुस्तीही होईल आणि दोन्ही पाहुणे अंतराळयात्री व्यवस्थित परत येतील. परंतु सूक्ष्म इंधन गळती किंवा अन्य काही गफलत झालीच कशी यावर चर्चा सुरू आहे. जास्त काळ ‘झीरो ग्रॅव्हिटी’ स्थितीत रहावे लागले तर या अंतराळयात्रींवर कोणता परिणाम होईल? असे बरेच प्रश्न आहेत. हे दोन्ही अंतराळ साहसी लवकरच पृथ्वीवर सुखरूप परत यावेत अशीच समस्त पृथ्वीवासीयांची इच्छा आहे. दरम्यान, या अंतराळयात्रींनी नासाच्या संशोधकांशी संवाद साधल्याच्या ‘तरंगता’ व्हिडीओ प्रसिद्ध झालेला पाहिला. हे यात्री मजेत दिसतात, पण त्यांचे भवितव्यही अधांतरी आहे!