![mihir-worli-hit-&-run mihir-worli-hit-&-run](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/mihir-worli-hit-run-696x447.jpg)
मुंबईतील वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीरने मद्यधुंद अवस्थेत महिलेला चिरडल्यानंतर तो तसाच भरधाव पुढे गेला. त्याने ओळख लपवण्यासाठी कारमध्ये केस कापले आणि दाढी केली, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच या घडटनेनंतर गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर मिहीर फरार झाला होता. त्याला कोणी मदत केली याचा तपास सुरू आहे. तसेच त्याची सखोल चौकशी करायची असल्याने जास्तीत जास्त कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने मिहीरने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिहीर शहाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवत वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली. त्यानंतर त्याने ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून उघड झाले आहे. गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची माहिती मिहीर देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली, याचीही माहिती तो देत नाही. याबाबत त्याची चौकशी करण्यासाठी जास्तीत जास्त कोठडी देण्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार कोणाची आहे ,ती त्याला कुणी वापरायला दिली याचाही तपास करणे गरजचे आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
अपघातानंतर मिहीरने ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस कापले आणि दाढी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
मिहीर शहाच्या वकिलांनी सांगितले की, प्रकरणातील आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले आहे. आरोपीकडून तपासाला सहकार्य केले जात आहे. तपासात 95 टक्के माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही. आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाने महीरला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.