रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचे; अमोल कोल्हेंनी सरकारला सुनावले

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत आहे. तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा मुद्दाही चर्चेत आहे. या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला सुनावले आहे. स्थानकांची नावे बदलून शहरातील समस्या संपणार नाही. शहरे,स्थानके यांची नावे बदलण्याऐवजी जनतेला सुविधा पुरवणे गरजेचे आहे, असे कोल्हे यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे, असा आरोपही अमोल कोल्हे यांनी केला. तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यावर बोलताना, भाजपा सरकारमध्ये नावे बदलणे, हेच धोरण दिसत आहे. नावे बदलून शहरात पाणी साचायचे थांबत नाही, विमानतळाचे छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.