राहुल द्रविडने अडीच कोटींवर सोडले पाणी, कारण वाचून तुम्हीही कराल ‘द वॉल’चे मनभरून कौतुक

शेवटच्या चेंडू पर्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप उंचावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तब्बल 17 वर्षांनी टी20 चॅम्पियन झाली. यात मोलाचे योगदान दिले ते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी.

खेळाडू म्हणून अपूर्ण राहिलेले द्रविडची वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा प्रशिक्षक म्हणून पूर्ण झाली. अर्थात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यानंतरही द्रविडचे पाय जमिनीवर असून त्याने बक्षिसाची पूर्ण रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे.

वर्ल्डकप विजेत्या संघाला बीसीसीआयनं 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या रकमेपैकी प्रत्येक खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 5 कोटी रुपये देण्याचा, तर इतर सहाय्यक प्रशिक्षकांना अडीच कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र राहुल द्रविड याने 5 कोटी रुपये घेण्यास नकार दिला असून इतर प्रशिक्षकांप्रमाणे अडीच कोटी रुपये स्वीकार करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्याच्या या निर्णयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

द्रविडच्या जागी गंभीरची वर्णी

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागली. 2027 पर्यंत तो या पदावर कार्यरत असणार आहे. टीम इंडियाने 2007 आणि 2011 रोजी जिंकलेल्या वर्ल्डकप संघाचा तो भाग होता. दोन्ही वर्ल्डकपमध्ये फायनल लढतीत गंभीरने दमदार खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. नुकतेच त्याच्या मेंटोरशिप खाली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्पर्धेवर नाव कोरले. तेव्हापासून गंभीर टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा होती आणि मंगळवारी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर शिक्कामोर्तब केले.