Worli Hit And Run Case : शिवडी कोर्टाचा दणका, आरोपी मिहीर राजेश शहा याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबईमधील वरळी येथील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर राजेश शहा याला शिवडी कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मिहीर शहा याला कोर्टाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी मिहीर राजेश शहा याला आज पोलिसांनी शिवडी कोर्टात हजर केले. सुनावणीत शिवडी कोर्टाने मिहीर शहा याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी वरळी पोलिसांनी कोर्टात केली होती.

वरळीतील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात घटनेनंतर आरोपीला पळून जाण्यात आणि लपण्यात अनेकांनी मदत केली आहे, याचा तपास करावा लागणार आहे. तसेच आरोपीकडे कार चालवण्याचे लायसन्स होते का? तसेच घटनेनंतर कारच्या नंबर प्लेटची विल्हेवाट लावण्यात आली, ही नंबर प्लेट कुठे आहे? याचा तपास करावा लागणार आहे. यामुळे आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून कोर्टात करण्यात आली होती.

कार चालक आणि मिहीर शहा यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्यांचे फोनही ताब्यात घेतले आहेत. यामुळे पोलीस कोठडी कशाला हवी? असा प्रश्न मिहीर शहाच्या वकिलांनी उपस्थित केला होता. तसेच पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले होते. कार चालक आणि मिहीरचे जबाब मिळताजुळता आहे. मिहीरल अटक का केली, याचे कारणही पोलिसांनी सांगितले नाही, असा युक्तिवाद मिहीर शहाच्या वकिलांनी केला. मात्र, शिवडी कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. मिहीर राजेश शहा याला दणका देत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.