Worli Hit and Run नरकातून राक्षस आला तरी एवढा भयंकर प्रकार करणार नाही, आदित्य ठाकरे भडकले

वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची बुधवारी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांना नाखवा कुटुंबियांचे सांत्वन केले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मिहीर नाखवा याला अत्यंत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

 

”नाखवा कुटुंबियांना भेटून मन हलून गेले एकदम. ही अत्यंत बेकार हिट अँड रनची केस आहे. खरंतर हा खूनच आहे. यात ठठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. नाखवा कुटुंबियांच्या डोळ्यात राग, दु:ख दिसत आहे. नाखवाजींनी तर हा सर्व प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर पाहिला. एवढी भीतिदायक गोष्ट आपल्या मुंबई महाराष्ट्रात होतेय. नरकातून राक्षस आला तरी एवढा भयंकर प्रकार करणार नाही अशी ही हिट अँड रन केस आहे. मिहीर राजेश शहा थांबला असता तर एक जीव वाचला असता. पण जसं फरफटत त्याने नेले ते भयंकर आहे. फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्याला सगळ्यात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझं म्हणनं आहे की त्याला या कोळीवाड्यात भरचौकात सोडा. एखादा गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकू शकतो पण एखादा राक्षस असेल तर काय करायचं? मिहीर राजेश शहा हा राक्षसच आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

”घटनेच्या 60 तासानंतर त्याला अटक झाली आहे. पोलिसांकडे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज आहे. मग साठ तास का गेले? गृहमंत्री का अजून काही बोलले नाहीत. या सरकारकडून पुढची काय कारवाई होणार ते बघायला हवे. ही जी त्या बारवर बुलडोजर कारवाई सुरू आहे तसा बुलड़ोजर मिहीर शहाच्या घरावर चालवणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला,