मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्यावेच लागेल! मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा समाज सहनशील आहे, म्हणून त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका. मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या. आम्ही कुणाच्याही हक्काचे मागत नाही. मागेल त्या मराठ्याला आरक्षण सरकारला द्यावेच लागेल, नसता त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथील मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीत दिला.

लातुरात आज मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीच्या निमित्ताने मराठा महासागरच अवतरला होता. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर तोफ डागली. आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. सरकारने आम्हाला तसा शब्द दिला आहे. आता शब्द फिरवाल तर विधानसभेला महागात पडेल, असा सज्जड दम जरांगे यांनी सरकारला भरला.

मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. भुजबळांना फुकटात आरक्षण मिळाले आहे. मराठ्यांचे आरक्षण ते चोरून खात आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला. भुजबळांना पुन्हा जेलात पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा-ओबीसीत भांडण लावून दंगली घडवण्याचा फडणवीस, भुजबळांचा कट असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

मराठा आरक्षणावर सरकार चालढकल करत असल्याचे दिसत आहे. आता फक्त सगेसोयर्‍यांचा प्रश्न शिल्लक आहे. त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करण्याचा कट आहे. पण मी हे होऊ देणार नाही. एकही कुणबी नोंद रद्द झाल्यास विधानसभेत २८८ उमेदवार पडलेच म्हणून समजा, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

11 जुलै रोजी बीड येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरून रॅलीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. सरकारने परवानगी रद्द केली तरी सुद्धा रॅली होणारच, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.