30 दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर काम बंद आंदोलन, ग्रामपंचायत कामगारांचे आंदोलन

वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या सात हजार ग्रामपंचायत कामगारांनी आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. सरकारने 30 दिवसांत आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करून ग्रामपंचायतीचा कारभार बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने कार्याध्यक्ष विलास कुमरवार आणि सल्लागार बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

राज्यात 28 हजार 813 ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, करवसुली लिपिक अशा पदांवर सुमारे 60 हजार कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करत आहेत. त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयांप्रमाणे वेतनवाढ मिळावी, पेन्शन, पीएफ, उपदान लागू करावे, वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करावी या मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या ग्रामपंचायत कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, जनार्दन मुळे, डॉ. जगताप, संजय वाघ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला तर सरकारच्या वतीने उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देऊ कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या.