वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला मंगळवारी रात्री साठ तासानंतर अटक केली. मिहीरला अटक होण्यापूर्वीच त्याचे वडील व मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यावरून कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी संताप व्यक्त केला आहे. या सर्व प्रकरणावरून प्रदीप नाखवा यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.
”हे प्रशासन काहीच नाही, देवेंद्र फडणवीस काहीच नाही. गृहमंत्र्याच्या नावावर कलंक आहेत ते. तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत असं घडलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तुम्ही बोलता गरिबांचं सरकार आहे. कसलं गरिबांचं सरकार आहे तुमचं. गरिब दररोज असा रस्त्यावर मरतोय, त्याला बघणारं कुणी नाहीए. कुणी वाली नाहीए का आम्हाला? असा संतप्त सवाल नाखवा यांनी केला. राजेश शहा यांना मिळालेल्या जामिनावरून देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ”मिहीरच्या वडिलांना जामिन मिळालाच कसा? आज वडिलांना जामिन मिळाला, उद्या ड्रायव्हरला मिळेल परवा त्या आरोपीला जामिन मिळेल. आम्हाला न्याय कोण देणार? कोर्ट काय डोळ्यावर पट्टी बांधून चालतं का? इथे फक्त पैसा फेका तमाशा बघा चालतो, असा संताप प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केला आहे.
मिहीर शहा (23) याने रविवारी पहाटे वरळीच्या सीजे हाऊसजवळ दारूच्या नशेत तर्रर्र असताना भरधाव बीएमडब्ल्यू कार चालवून प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील प्रदीप व कावेरी नाखवा हे पती पत्नी त्या कारच्या बोनेटवर पडले. त्याही अवस्थेत गाडी थांबवा म्हणून नाखवा दाम्पत्य विनंती करत होते. पण दारूच्या नशेत बेधुंद झालेला चालक मिहीर शहा याने माणुसकी न दाखवता कार थांबवण्या ऐवजी ती चालूच ठेवली. दुर्दैवाने कावेरी या चाक आणि बंपरमध्ये अडकल्या. तरीही निर्दयी मिहीरने त्यांना दीड किमी अक्षरश: फरफटत नेले. पुढे जाऊन त्याने कार थांबवली आणि आपल्या जागा बदलल्या. मिहीर शेजारच्या तर मुळ चालक बिडावतला स्टेअरिंगवर बसवले. तिथेही त्यांनी कळस केला. कावेरी यांना बंपर मधून काढून रस्त्यात तसेच ठेवले. मग गाडी मागे घेऊन पुन्हा कावेरी यांच्या अंगावर चढवून आरोपींनी पळ काढला. आरोपी नशेत होते, घटना पहाटेला घडली. पण तरीही पोलिसांना मिहीर मिळाला नाही. मुंबईत जागोजागी सीसीटीव्ही असताना पोलिसांना मिहीर तीन दिवस मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे.
रक्तात दारूचा अंश कसा मिळणार
अपघात होऊन तीन दिवस उलटले त्यामुळे आता दारू पिऊन अपघात करणाऱ्या मिहीरच्या रक्तात दारूचा अंश सापडणार कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिहीर हा सराईत गुन्हेगार नाही. सराईत गुन्हेगारांना लिलया पकडणाऱ्या मुंबई पोलिसांना मिहीरला पकडायला दोन दिवस का लागले. यात काही राजकीय दबाव होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्या बारवर एक्साईज विभागाची कारवाई
वरळी येथील हिट अँड रन प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज)ने जुहू येथील वीस ग्लोबल तपास बारवर कारवाई केली आहे. एक्साईज विभागाने बारच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत बारमध्ये दारूविक्री आणि खरेदीचे व्यवहार करू नये अशा सूचनादेखील दिल्या आहेत. आज सकाळी पोलिसांचे पथक त्या बारमध्ये गेले होते. पोलिसांनी त्या बारची तपासणी केली.