जम्मू-कश्मीरमध्ये 72 तासांपासून जवान दहशतवाद्यांशी लढताहेत, मोदी पुतीनसोबत सूर आळवताहेत

जम्मू-कश्मीरमध्ये धुमश्चक्री सुरूच असून लष्कराचे जवान दहशतवाद्यांशी गेल्या 72 तासांपासून प्राणपणाने लढत आहेत. आतापर्यंत पाच जवान शहीद झाले असून डोडा, उधमपूर, कठुआ, बसंतगढ, सेऊज, बानी, डग्गार येथील घनदाट जंगलात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये एकापाठोपाठ एक जवान धारातीर्थी पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाची राजधानी मॉस्को येथे सूर आळवत होते. ‘मेरा जुता है जपानी, पतलून इंग्लिशतानी, सर पे लाल टोपी रुसी’ हे गाणे मोदींनी गायले आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याकडून पाहुणचार घेतला. यावरून विरोधकांकडून एनडीए सरकारवर जोरदार टीका होत आहे.

दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले सुरू असून जम्मू-कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराने शोधमोहीम आणखी तीव्र केल्याची माहिती पोलीस महासंचालक आर.आर. स्वैन यांनी दिली. सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्जिकल ऑपरेशन सुरू
दहशतवाद्यांकडून सुरू असलेले हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांचा अक्षरशः टिपून खात्मा करण्यासाठी लष्कराकडून सर्जिकल ऑपरेशन सुरू आहे. हॅलीकॉप्टर तसेच निमलष्करी दल, विशेष सुरक्षा दल आणि ड्रोन, स्नायफर डॉग, मेटल डिटेक्टर यांच्या माध्यमातून घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचे अड्डे शोधून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे लष्कर तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज घडी भगवा जंगलात चकमक
जम्मू-कश्मीरमधील डोडा जिह्याच्या सुदूर जंगलात आणि घडी भगवा जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार तत्काळ सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. लष्कराच्या जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुरूच आहे.

– काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतानाच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कठोर कृती हे सातत्यपूर्ण दहशतवादी हल्ल्यांना उत्तर आहे, पोकळ भाषणे नव्हे, असे राहुल यांनी एक्सवर म्हटले आहे. तर खोटे दावे, पोकळ बढाया आणि छाती बडवण्याचे कितीही प्रकार केले तरी मोदी सरकार जम्मू आणि कश्मीरमधील सुरक्षेच्या बाबतीत संकटकारक आहे हे तथ्य खोडून काढता येणार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.