विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर महाविकास आघाडीची चर्चा

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज विधान भवनात झाली. या बैठकीमध्ये आघाडीच्या नेत्यांनी आपले तीनही उमेदवार निवडून यावेत यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा केली. त्यानंतर चर्चेचा तपशील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवण्यात आला.

विधान भवनात झालेल्या या बैठकीला शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार आहेत. हे तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीतील पक्ष एकत्रितरीत्या काम करत आहेत. त्याच संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.