विमान कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेला सोडले वाऱ्यावर; दिल्ली एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार

जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या अलायन्स एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱयांनी एका आजारी वृद्ध महिलेला विमानात सोडून दिले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर महिलेला व्हीलचेअरही दिली नाही. ‘माझी मदत करा. आईची तब्येत बिघडलेय. तिला एक व्हीलचेअर तरी द्या. असे कसे काय सोडून जाऊ शकता,’ असे वृद्ध महिलेचा मुलगा ओरडत राहिला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

ही घटना रविवारी रात्री घडली. अलायन्स एअरवेजचे फ्लाइट जयपूरहून संध्याकाळी 7.35 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार होते. या विमानाने शशिकला गोस्वामी, वय वर्षे 84 त्यांचा मुलगा सुशील गोस्वामीसोबत जयपूरहून दिल्लीला जात होत्या. मी आणि आई विमानात एकटेच बसलो होतो. सुमारे 15 ते 20 मिनिटे विमानात बसल्यानंतर एसी बंद झाला. आम्हाला गुदमरल्यासारखे वाटू लागले. मी कसे तरी आईला विमानातून बाहेर काढले. आईला मधुमेहासोबत पार्किन्ससचा आजार आहे. चालायला त्रास होतो, असे सुशील यांनी सांगितले.

मुलाला स्वतःच आणावी लागली व्हीलचेअर
विमानाजवळ आईला थांबवून त्यांचा मुलगा सुशील ग्राउंड स्टाफकडे व्हीलचेअर घेण्यासाठी गेलो. तेथील कर्मचाऱ्यांनीही सुशीलला मदत केली नाही. उलट तिथे ठेवलेली व्हीलचेअर घेऊन जाण्याचा सुशीलने प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. सुशीलने जबरदस्तीने व्हीलचेअर हिसकावली आणि आईला त्यावर बसवले.