
सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने डेन्मार्कच्या होल्गर रूनेचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करीत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र विजयानंतर त्याने त्याला चिडविणाऱ्या प्रेक्षकांसोबत राडाही केला.
सात वेळा विम्बल्डनचा डॉन ठरलेला जोकोविच कारकीर्दीतील 25 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या शोधात आहे. मात्र आजच्या लढतीदरम्यान काही प्रेक्षक रूनेच्या समर्थनार्थ घोषणा देत होते, मात्र ते प्रेक्षक आपल्याला चिडवीत होते, असा आरोप जोकोविचने केला. त्यामुळे आपण त्या प्रेक्षकांशी भिडलो, असे जोकोविचने सांगितले. ‘कोणाला समर्थन द्यायचे हा प्रेक्षकांचा अधिकार आहे, मात्र मी 20 वर्षांपासून टेनिस कोर्टवर खेळतोय. खेळाडूला समर्थन देणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला चिडवणे यातील फरक मला चांगलाच कळतो. मी खऱया प्रेक्षकांचा सन्मान करतो, पण कोणी सीमा ओलांडत असेल तर त्याला मी तशीच प्रतिक्रिया देणार,’ असेही जोकोविचने स्पष्टपणे सांगितले.