
जालना जिल्ह्यातील परतुर ते आष्टी रोडवर अवैधरित्या दारुचा साठा विक्रीसाठी घेवून जाणार्या आरोपीच्या ताब्यातून परतुर पोलीसांनी तब्बल 5 लाखांचा दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालक व मालकासह वाइन शॉपच्या मालकाविरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर ते आष्टी रोडवर स्वतःच्या फायद्यासाठी अवैध विक्री करण्यासाठी इंग्लिश दारूची वाहतूक करताना पिकअप टेम्पोमध्ये अवैध दारू घेऊन जात असताना पिकअप चालक ईश्वर नारायण वाघमारे रा. गुरु पिंपरी. ता. घनसावंगी तसेच त्याचा मालक संभाजी कोल्हे रा. गुरु पिंपरी ता. घनसावंगी यांना पोलीसांनी पकडले. टेम्पोमध्ये इम्प्रियल ब्लू व्हिस्की कंपनीचे दारूचे दहा बॉक्स किंमत 76 हजार 800, रॉयल चॅलेंज व्हिस्की कंपनीचे दारूची दहा बॉक्स किंमत 86 हजार 400 रुपये,रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीचे दारूचे 50 बॉक्स किंमत 43 हजार 200 दारुच्या साठ्यासह महिंद्रा पिक अप;r 5 लाख रुपये असा एकूण 10 लाख 95 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परतुर पोलीस ठाण्यात दारूचा अवैध वाहतूक करणारा आरोपी चालक ईश्वर नारायण वाघमारे रा. गुरु पिंपरी,त्याचा मालक संभाजी कोल्हे रा. गुरु पिंपरी ता. घनसावंगी, जालन्यातील रुपम वाइर शॉपचे मालक राम अग्रवाल यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस आमलदार दीपक आडे, ज्ञानेश्वर वाघ, अच्युत चव्हाण, सतीश जाधव, चालक धोत्रे आदींनी केली आहे.