अग्निवीर योजना बंद करा, शहीद कॅप्टनच्या मातेची कळकळीची विनंती; राहुल गांधी यांचं आश्वासन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली या आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघाचा हा पहिलाच दौरा होता. यावेळी राहुल गांधी यांनी शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह आणि आई मंजू सिंह यांची भेट घेतली. हे कुटुंब यूपीतील देवरियाचे राहणारे आहे. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना राष्ट्रपतींकडून काही दिवसांपूर्वी मरणोत्तर किर्तीचक्र प्रदान करण्यात आले. हे किर्तीचक्र अंशुमन सिंह यांची आई आणि पत्नीने स्वीकारले.

अग्निवीर योजना तत्काळ बंद करा, अशी मागणी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची आई मंजू सिंह यांनी केली. सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे, अग्निवीर योजना बंद करा. अग्निवीर चार वर्षांसाठीची योजना योग्य नाही. लष्करातील जवानांना ज्या सुविधा मिळातात त्या सर्व सुविधा अग्निवीरच्या जवानांना मिळाव्यात, अशी मागणी मंजू सिंह यांनी केली. यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. अग्निवीर योजना बंद करण्यासाठी लढाई सुरूच राहील, असे म्हणत राहुल गांधी यांनी आश्वासन दिले.