Worli Hit and Run : मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक

mihir-worli-hit-&-run

वरळीच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अपघातानंतर तीन दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मिहीरला ठाण्यातील शहापूर येथून मुंबई पोलिसानी अटक केली आहे.

रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी कोळीवाड्यात राहणारे कावेरी व प्रदीप नाखवा हे दाम्पत्य मासे घेऊन वरळीच्या दिशेने निघाले होते. ते वरळी येथील सीजे हाऊसनजीक आले असता मागून भरधाव आलेल्या बीएमडब्लू कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील प्रदीप आणि कावेरी हे दाम्पत्य कारच्या बोनेटवर पडले. त्यावेळी कारला ब्रेक मारल्याने प्रदीप कसेबसे तेथून बाजूला फेकले गेले, पण कावेरी यांच्या साडीचा पदर डाव्या बाजूच्या चाकात गुंतला गेला. एवढे होऊनही मिहीरने कार न थांबवता दीड किलोमीटरपर्यंत कावेरी यांना फरफटत नेले. त्यानंतर एके ठिकाणी कार थांबवून दोघे बाहेर आले आणि चाक व बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना काढून तेथेच ठेवले आणि दोघेही सुसाट पळून गेले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात काही बाबींच्या आधारे मिहीर शहाचा बाप आणि मिंधे गटाचा नेता राजेश शहा तसेच चालक राजऋषी बिडावत अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. राजेश आणि बिडावत यांना वरळी पोलिसांनी आज शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील भारती भोसले यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर राजेश शहाला जामीन मंजूर केला तर बिडावतला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.