विधान परिषदेचे सभापतीपद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधा महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज दुपारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील या भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. विधान परिषदेचे सभापतीपदाची निवडणूक का घेतली जात नाही? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
विधान परिषदेचे सभापतीपद मागच्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. विधान परिषदेच्या सभापतींची निवड व्हावी, अशी भूमिका विरोधी पक्षांनी वारंवार मांडली आहे. यावेळेस सभागृहातही त्यावर चर्चा झाली. संविधानिक पद अडीच वर्षे रिक्त रहावं, हे घटनेच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीतील आम्ही सगळ्यांनी मिळून राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली, असे अंबादास दानवे राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले.
विधान परिषेदेच्या सभापतींची निवडणूक घेणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. परंतु, कॅबिनेटने राज्यपालांना कळवलं पाहिजे. आमचं महाविकस आघाडीचं सरकार असताना आम्ही राज्यपालांना कळवलं होतं. पण या कॅबिनेटने अजूनही विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याचं राज्यपालांना कळवलेलं नाही. आणि म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे अंबादास दानवे यांनी पुढे सांगितले.
आमच्या कॅबिनेटने जे कवळलं त्या आधारावर किंवा या सरकारला तुम्ही सूचना करून विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक झाली पाहिजे. कारण ही निवड न होणं हे घटनेच्या विरोधात आहे, अशी भूमिका आम्ही राज्यपालांकडे मांडली. राज्यपालांना या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.