आता लढाई गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारी विरुद्ध; उद्धव ठाकरे गरजले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थित वसंत मोरे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिकांचं स्वागत केलं. लोकसभा निवडणुकीची लढाई झाली. आता लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारी विरुद्ध होणार, असे उद्धव ठाकरे गरजले.

वसंत मोरे यांच्यासह शिवसेनेत स्वगृही परतलेल्या शिवसैनिकांचे स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरे काय करणार? हे आम्ही सगळे बघत होतो. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असतो. तुम्ही पहिले शिवसैनिक होता. मधल्या कळात तुम्ही इतर पक्षात गेलात. पण शिवसेनेच्या बाहेर इतर पक्षात काय वागणूक मिळते? काय सन्मान मिळतो? मिळतो का? हा अनुभव घेतलात. तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, तुमचं काम आणि जबाबदारी ही मोठी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवबंधन बांधत असताना काहीजण म्हणाले आम्ही पहिले शिवसैनिक होतो. आता तुम्हाला सगळ्यांना शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे. ती वसंत मोरे यांनाही झाली पाहिजे. पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, ही तुमची शिक्षा आहे. शिक्षा या अर्थाने घेऊ नका, ही जबाबदारी म्हणून घ्या. पुण्यातनं तुम्ही आलात. तरी  गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली आहे. ही लोकशाही आणि संविधान धोक्यात आलं होतं. संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र पुढे सरसावला. ती लढाई संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणाची होती. आता जी लढाई होणार आहे ती गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची ही लढाई होणार आहे. पुणे म्हटलं की क्रांतिकारक, विचारवंत आणि विद्येचं माहेरघर आहे. त्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. सत्ताबदलाची सुरुवात पुण्यातून झाली पाहिजे, अशी सूचना वजा आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

लवकरात लवकर पुण्यात शिवसैनिकांच्या मेळाव्याला येईन. त्यावेळी शहरातले सर्व शिवसैनिक एकत्र बोलवा. सगळ्यांच्या भेटीसाठी मला यायचंच आहे. तूर्त वसंत मोरे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना शिवसेनेत सामवून घेताना आनंद होतोय. तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यात पुढे जाईल. पुण्यात एक काळ असा होता त्यावेळी शिवसेनेचे आपले पाच आमदार होते. तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. पुणा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचं आहे. आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकवाल, अशी खात्री असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.