कमिशनखोर मुख्यमंत्र्यांमुळे मुंबई पहिल्याच पावसात बुडाली

पहिल्याच पावसात मुंबई आणि उपनगरातील परिस्थिती भयावह झाली असून राज्याचे नेतृत्व करणाऱ्या कमिशनखोर मुख्यमंत्री आणि त्यांच्या टक्केवारीफेम मंत्र्यांमुळे मुंबई पावसात बुडाली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पावसाने मुंबईची दाणादाण उडवली असून महाभ्रष्ट महायुती सरकारचे पितळ उघडे पडले आहे, असे पटोले म्हणाले.

मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले आहेत. रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले आहेत. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना मिंधे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सूत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले. मुंबईत कोटय़वधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली, अटल सेतूला भेगा पडल्या, हा महायुतीचा विकास आहे का, असा सवालही पटोले यांनी केला.