
आधीच घरची परिस्थिती हलाखीची त्यातच अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरासह आतील संपूर्ण सामान जळून बेचिराख झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जोगेश्वरी पूर्व येथील राठोड कुटुंबीयांचा संसार उघडय़ावर पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राठोड कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावली असून घराच्या पुनर्बांधणीकरिता त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यामुळे राठोड कुटुंबीयांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
जोगेश्वरी पूर्व येथील श्याम नगर, लक्ष्मीवाडी येथे राहणारे सुरेश राठोड रोजंदारीवर कडीया काम करतात. नुकतीच त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचे घर जळून पूर्णपणे खाक झाले. ही बाब लक्षात येताच माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर आणि शाखा पदाधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घराच्या पुनर्बांधणीकरिता माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदकुमार ताम्हणकर, शाखा समन्वयक उदय हेगिष्टे, उपशाखाप्रमुख रवींद्र सोगम, गटप्रमुख अविनाश रासम, महेंद्र खोत, सखाराम बांदेकर, शैलेश बांदेलकर आणि राजा आडे आदी उपस्थित होते.