श्रीलंकेचे प्रशिक्षकपद जयसूर्याच्या हाती

नुकत्याच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकन संघाची सुमार कामगिरी झाल्यामुळे संघाचे प्रशिक्षकपद सोडणाऱया खिस सिल्व्हरवूडच्या जागी स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्याची निवड करण्यात आली आहे, मात्र तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेसाठी ही भूमिका निभावणार आहे. येत्या 27 जुलैपासून हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळेल. सिल्व्हरवूडच्या राजीनाम्यानंतर लंकेचे प्रशिक्षकपद रिक्तच होते. एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय जयसूर्या हिंदुस्थानविरुद्धच्या पांढऱया चेंडूच्या क्रिकेटबरोबर इंग्लंडविरुद्धच्या लाल चेंडूच्या क्रिकेट मालिकेतही प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडणार आहे. याआधी जयसूर्या श्रीलंकेच्या निवड समितीतही होता आणि नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाचा सल्लागारही होता. जयसूर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे श्रीलंकेने 1996 साली आपले पहिले-वहिले संस्मरणीय वर्ल्ड कप जिंकले होते.