अकार्यक्षम, बेकायदा मुख्यमंत्र्यांमुळे मुंबईची ही अवस्था, आदित्य ठाकरे कडाडले

मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. भयंकर, अकार्यक्षम, बेकायदा मुख्यमंत्री आणि सध्या त्यांच्या अखत्यारित असलेल्या महानगरपालिकेने पावसाळापूर्व कामांकडे दुर्लक्ष केल्याने मुंबईची ही अवस्था झाली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे कडाडले.

निवडणुकांच्या काळातच पावसाळी कामे खोळंबल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही सरकारने सर्व लक्ष निवडणुकांवर केंद्रीत केले होते असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत तसेच मर्जीतल्या कंत्राटदारांनाच कामे दिली जात आहेत, त्यामुळेचे मुंबईत अशी परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईसाठीचे उत्तरदायीत्व नसलेले मुख्यमंत्री राज्यकारभार चालवत आहेत, असा सणसणीत टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

पाण्याचा निचरा करणारे पंप, पंपिंग स्टेशन, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या टाक्या, सर्वेक्षण अशा सर्व क्षमता असूनही आज मुंबई विस्कळीत झाली, असे सांगतानाच, मुख्यमंत्री केवळ आपत्ती व्यवस्थापन कक्षातून फोटो देऊ शकतात, त्यांचे प्रेम नाले साफसफाईऐवजी पाहणीवेळी कार्पेटवर उभे राहून फोटो काढण्यावरच आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर शरसंधान केले.