हिंदुस्थानचे ऑलिम्पिक पथक सवाशेपार; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंचा विक्रमी सहभाग

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 124 खेळाडूंचे विक्रमी पथक उतरले होते. त्यांनी 7 पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता हिंदुस्थान खेळाडूंचा आकडा सवाशेपार गेला असून सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम नोंदविण्यासाठीही खेळाडू सज्ज झाले आहेत.

नुकताच टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप संपला आणि पॅरिस ऑलिम्पिकचे नगारे वाजायला लागलेत. क्रीडा विश्वातील या सर्वोच्च महाकुंभाचा शंखनाद 26 जुलैला होणार आहे. हिंदुस्थानी खेळाडूंचीही पॅरिस ऑलिम्पिकसाठी जय्यत तयारी सुरू आहे. हिंदुस्थानने 1900 साली देश पारतंत्र्यात असताना ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पाऊल टाकले होते. त्यावेळी नॉर्मन प्रिचर्ड या धावपटूने 200 मीटर स्प्रिंट व 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकांची कमाई करीत हिंदुस्थानचे नाव ऑलिम्पिकच्या नकाशावर झळकावले होते. हिंदुस्थानची ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाली होती. हिंदुस्थानी खेळाडूंनी एका सुवर्णासह सात पदके जिंकून इतिहास घडविला होता. यावेळी हिंदुस्थानी खेळाडूंकडून पदकांचा नवा इतिहास घडविण्यासाठी देशवासीयांना आशा आहे.

हिंदुस्थानचे 26 वे ऑलिम्पिक
हिंदुस्थानी खेळाडूंचे पथक ऑलिम्पिकमध्ये 26व्यांदा उतरणार आहे. यातील 20 ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू तिरंगा ध्वजाखाली खेळले होते. कारण पहिल्या पाच ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू इंग्रजांच्या राजवटीखाली खेळले होते. गतवेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे सर्वाधिक 124 खेळाडूंचे पथक सहभागी झाले होते. यावेळी पथकाचा आकडा सवाशेपार जाणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

हिंदुस्थानकडे 35 ऑलिम्पिक पदके
हिंदुस्थानी खेळाडूंनी एकूण 35 पदके जिंकली आहेत. यात 10 सुवर्ण, 9 रौप्य व 16 कांस्यपदकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 8 सुवर्णपदके ही हॉकी संघाने जिंकली आहेत. याचबरोबर नेमबाज अभिनव बिंद्रा, भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी दोन वैयक्तिक सुवर्ण जिंकली आहेत.

पदकांवर नेमबाजांचाच निशाणा
हिंदुस्थानची नेमबाजीतील ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच खेळाने हिंदुस्थानला सर्वाधिक वैयक्तिक पदके जिंकून दिली आहेत. यंदाही याच खेळात तब्बल 22 खेळाडू पदकांवर आपला निशाणा लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गतवर्षी जितकी पदके हिंदुस्थानने ऑलिम्पिकमध्ये जिंकली होती, त्यापेक्षा अधिक पदके जिंकण्याचे स्वप्न नेमबाजांनी पाहिले आहे. या जिगरबाज नेमबाजांचा निशाणा अचूक लागला तर हिंदुस्थान प्रथमच पदकांचा दोनअंकी आकडाही सहजपणे गाठेल. तसेच हिंदुस्थानला कुस्ती आणि ऍथलेटिक्समध्येही जोरदार कामगिरीची अपेक्षा आहे.