Worli Hit And Run: मुख्य आरोपीचे वडील मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांना जामीन मंजूर

मुंबईतील वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याचे वडील राजेश शहा यांना सोमवारी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा हा अद्याप फरार आहे.

वरळीतील 45 वर्षीय महिलेचा जीव घेणाऱ्या मिहिर शहा याचे वडील आणि मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता असलेल्या राजेश शहा यांना मुंबई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र शहा यांना 15,000 रुपयांचा तात्पुरता रोख जामीन मंजूर करण्यात आला आहे. अपघातानंतर मिहिरला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरूर राजेश शहा यांना रविवारी अटक करण्यात आली होती. मिहिरला पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली असून मिहिरला देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी एक लूक आऊट सर्क्यूलर (LOC) काढण्यात आले आहे.

रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळीतील एट्रिया मॉलजवळ मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव गाडीने उडवले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला होता.