पावसाचा जोर कायम; राजापूरातील पूर ओसरला, नद्यांची पाणी पातळी घटली

सलग तिसऱ्या दिवशी आज पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. ढगाळ वातावरण आणि संततधारांमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जगबुडी, शास्त्री, अर्जुना, कोदवली या नद्यांची पाणीपातळी घटली आहे. राजापूर शहरातील पूर ओसरला आहे. मात्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एसटीच्या अनेक फेऱ्या आज रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला.

रविवारी संध्याकाळी पावसाने जोर धरल्यामुळे खेडमधील जगबुडीनदी, संगमेश्वरमधीत शास्त्रीनदी, राजापूरातील कोदवली आणि अर्जुना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले होते. मात्र आज सकाळनंतर नद्यांची पाणी पातळी ओसरली. जगबुडी आणि कोदवली या दोनच नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. इतर सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 1, 094 मिमी पाउस पडला. सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. मंडणगडमध्ये 158.60 मिमी, दापोलीमध्ये 147.10 मिमी, खेडमध्ये 132.50 मिमी, गुहागरमध्ये 79.70 मिमी, चिपळूणमध्ये 114 मिमी, संगमेश्वरमध्ये 130.50 मिमी, रत्नागिरीमध्ये 58.40मिमी, लांजामध्ये 147.50 मिमी, राजापूरमध्ये 125.80 मिमी पाऊस पडला. रत्नागिरीमध्ये उद्या मंगळवारीही अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.