पावसाची कृपा! पवई तलाव भरून वाहू लागला

रविवार पासून रायगड, मुंबई, ठाणे परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पवई तलाव भरुन वाहू लागला आहे.या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज 8 जुलै रोजी पहाटे 4:45 च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.