मुंबईला अदानीच्या तावडीतून सोडवण्यासाठी संघटनांची एकजूट, मिंधे सरकारला शिकवणार धडा

दिल्लीतल्या मोदी सरकारच्या इशाऱयावरून राज्यातले मिंधे सरकार सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या मुंबईतील सरकारी जमिनींची खैरात अदानीला करत सुटले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली आधीच 550 एकरच्या जमिनीचा कवडीमोलाने सौदा केल्यानंतर आता याच प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील सुमारे दोन हजार एकर जागा अदानीच्या घशात घातली जाणार आहे. मात्र, मिंधे सरकार आणि अदानीकडून होणारी ही लुटमार रोखण्यासाठी चार संघटनांनी एकत्र येत मुलुंडमध्ये धारावीसह मुंबई बचाव समिती स्थापन केली आहे. त्यामुळे केवळ धारावीपुरती मर्यादित असलेले हे आंदोलन आता आणखी तीव्र होणार असून ते मुंबईभर पसरणार आहे.

मुंबईतील विविध सरकारी भूखंड आणि जागा या उद्यान, शाळा आणि रुग्णालय यासारख्या सार्वजनिक हितासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली याच जागांवर अदानीची वक्रदृष्टी पडली असून विविध कल्याणकारी हेतूसाठी मुंबईतील विविध ठिकाणी आरक्षित असलेले हे भूखंड मिंधे सरकार अदानीला देत सुटले आहे. या विरोधात आता मोठा लढा उभारला जाणार असून त्याच धर्तीवर मुलुंडमध्ये शनिवारी राजे संभाजी सभागृहात विविध संघटनांनी प्रदीर्घ चर्चेनंतर मुंबई बचाव समिती स्थापन केली आहे. यावेळी माजी आमदार-धारावी बचाव समितीचे सदस्य बाबूराव माने, अॅड. राजेंद्र कोरडे, अॅड. संदीप कटके, नसरुल हक, सुभाष पाखरे, जगन्नाथ खाडे, प्रयासचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे, अमोल गुप्ते, भरत सोनी, लोक चळवळीचे किरण पेहलवान, विक्रोळीचे सामाजिक कार्यकर्ते संजय येवले आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बचाव समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देणार आहे. या भेटीनंतर एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

अशी आहे समितीची रचना

मुंबई बचाव समितीमध्ये धारावी बचाव समिती, लोक चळवळ, प्रयास या संघटना आणि संस्थांसह विक्रोळीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी या समितीमध्ये असणार आहेत. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन उभे केले जाणार आहे.

उद्या म्हणतील, आझाद मैदानाची जागाही द्या!

मोदींच्या आशीर्वादामुळे अदानी जिकडे बोट दाखवतील ती जमीन मिंधे सरकार अदानीला देत सुटले आहे. त्याबाबतचे आदेश एका दिवसात काढले जात आहेत. जमिनीची ही भूक एवढ़य़ावर थांबेल असे वाटत नाही. त्यामुळे अदानी उद्या आझाद मैदानाची जागाही द्या म्हणतील. मग मिंधे सरकार आझाद मैदानही अदानीच्या घशात घालणार का, असा संतप्त सवाल शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी केला आहे.