या घटनेला राजकीय रंग नको, आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी मागणी

वरळी येथील हिट अॅण्ड रन प्रकरणाला कोणताही राजकीय रंग न देता दुर्घटनेतील बीएमडब्लू गाडीचा चालक मिहीर शहा याला अटक करून त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली.

मिहीर शहा याच्या भरधाव गाडीने वरळी कोळीवाडय़ातील प्रदीप आणि कावेरी नाकवा यांच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यात कावेरी यांचा मृत्यू झाला. आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडय़ात जाऊन नाकवा कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटना आणि तपासासंदर्भात माहिती घेतली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बीएमडब्ल्यू गाडी चालवणारा मिहीर शहा लवकर पकडला गेला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मिहीर हा मिंधे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याने चौकशीत राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो अशी शक्यता यावेळी माध्यमांनी व्यक्त केली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कुणी कोणत्याही पक्षाचा असो हिंदुस्थानचा नागरिक म्हणून माझी मागणी आहे की, आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. शहा कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण या प्रकरणाला राजकीय रंग न देता कारवाई झाली पाहिजे.

सर्व नाक्यांवर ट्रफिक पोलीस असावेत

मुंबईत गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चालली आहे. राँग साईड ड्राईव्ह, सिग्नल तोडणे असे प्रकार जागोजागी होतात, असा मुद्दा मागच्या अधिवेशनात आपण मांडला होता. कायद्याचा दबाव असला तरच हे आटोक्यात येईल. केवळ सीसीटीव्हीवर विसंबून चालणार नाही. सर्वत्र ट्रफिक पोलीस असायला पाहिजेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.