महाराष्ट्र गद्दारांचा आणि लाचारांचा होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांची शिवसंकल्प मेळाव्यात गर्जना

महाराष्ट्र हा साधू-संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपण जपणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार, असा प्रश्न विचारतानाच काहीही झाले तरी लाचारीचा, गद्दारीचा आणि हरामखोरीचा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात केली.

छत्रपती संभाजीनगरात बीड बायपासवरील सूर्या लॉन्सवर रविवारी शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओसंडून वाहणाऱ्या गर्दीसमोर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर मी प्रथमच छत्रपती संभाजीनगरात आलो आहे. कारण इथला पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. भाजपच्या चारशेपारच्या असुरी महत्त्वाकांक्षेला महाराष्ट्राने लगाम घातला. पण त्यात शिवसेनाप्रमुखांच्या छत्रपती संभाजीनगरचा खासदार नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला गद्दारीचा कलंक पुसून छत्रपती संभाजीनगरवर पुन्हा डौलाने भगवा फडकवायचा आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच टाळय़ांचा उत्स्फूर्त कडकडाट झाला.

छत्रपती संभाजीनगरात पराभव झाला, कोकणात झाला. निवडणुकीत हारजीत ठरलेलीच. चंद्रकांत खैरे यांच्या एवढय़ा वर्षांच्या निष्ठेचा आदर केला, त्यांना उमेदवारी दिली. पण आपला पराभव झाला. एक निवडणूक म्हणजे सर्वस्व नाही. हरलो तरी पुन्हा जिंकणारच या इर्षेने इथे आलो आहे. लोकसभेची निवडणूक ही लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी होती. विधानसभेची निवडणूक ही अस्मितेची आहे. महाराष्ट्र हा संतांचा आहे. लाचार, गद्दार, हरामखोरांचा नाही! गद्दारांचा महाराष्ट्र अशी ओळख महाराष्ट्राची होऊ देणार नाही, याच इर्षेने मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

वीज बिलासह थकबाकीही माफ करा

अधिवेशन सुरू झाले तेव्हाच मी हे गळती सरकार असून त्याच्या निरोपाचे अधिवेशन असल्याचे म्हटले होते. योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र सध्या दिसत आहे. नुसत्या घोषणांची नव्हे, थापांची बरसात होत आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. केंद्रात दहा वर्षे भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. किती योजना जाहीर केल्या, किती अमलात आणल्या… जरा हिशेब देता का? आता वीज बिल माफ करण्याची घोषणा केलीय. नुसते वीज बिल माफ करून काय होणार? थकबाकीचे काय करायचे? अधिवेशन सुरू आहे. थकबाकीसह वीज बिल माफ करण्याचा निर्णय घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिले.

पाप लपवण्यासाठी योजनांचा भडिमार

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. काय करतेय सरकार? नुसत्या योजनांवर योजना! पाप लपवण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी योजनांचा भडिमार चालू आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली. महिलांसाठी योजना आणली, स्वागत आहे. तरुणांसाठी काय योजना आहे? शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे? त्या घरातील वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची योजना तो दिवा पेटवू शकणार आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. स्वाभिमानी महाराष्ट्राने मोदींची गॅरंटी धुडकावून लावली, तिथे गद्दारांच्या गॅरंटीला बळी पडणार आहात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केला.

भाजपच्या गटारगंगेत डुबकी मारली की पवित्र

‘हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे’ हे आजच्या शिवसंकल्प मेळाव्याचे ब्रीद आहे. किती पाप जाळणार? सगळीकडे नुसते ढोंगाचे स्तोम माजले आहे. कालच एका गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकली. मोदी म्हणतात, पाप करा खुशाल रे, हाती माझ्या भाजपा रे! पाप करा आणि भाजपात या! भाजपाच्या गटारगंगेत डुबकी मारा, पवित्र व्हाल! पुण्यवान व्हाल! शेतकरी त्रस्त आहे. शेतीची औजारे, खते, बी-बियाणांवर जीएसटी लावलाय. चरकात पिळून काढायचे आणि नंतर उपकार केल्यासारखे तोंडावर फेपून मारायचे, असा महाराष्ट्र कधी नव्हता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विमानतळाचे नामांतर का होत नाही?

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. दोन वर्षे झाली, मिंध्यांचे सरकार आहे. मग का नाही विमानतळाचे नामांतर झाले अजून? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. लोकसभेच्या अधिसूचनेतही अजून औरंगाबाद असेच नाव आहे, मग मिंधे सरकारने केले काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक का जिंकायची…

महाराष्ट्राची वाताहत लावण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र भिकेला लावून मोदींच्या दारात उभा केला आहे. सगळा मामला खुर्चीचा! गद्दार होईन, पण खुर्ची वाचवेन! पण मी मात्र खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण गद्दारी करणार नाही हा स्वाभिमान जपला. आता निवडणुका जिंकण्यासाठी योजनांची थापेबाजी सुरू झाली आहे. या योजना फक्त दोन-तीन महिन्यांसाठीच असतील, नंतर त्या गुंडाळल्या जातील. जालन्यातील एका गद्दाराने हेच सांगितले. हीच थापेबाजी जनतेसमोर आणा. यांची नाटके उघड करा. त्यासाठीच निवडणूक जिंकायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभेची लढाई देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची होती आणि येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची असेल. महाराष्ट्राची ओळख जगात काय असावी, इतिहासात काय लिहून ठेवायचे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. – उद्धव ठाकरे

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, उपनेते लक्ष्मण वडले, ज्योती ठाकरे, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली सध्या जातीपातीत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे. जातीजातीत कलह निर्माण करून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्यात येत आहेत. कायद्याच्या चौकटीत हा सगळा खेळ चालू आहे. त्यामुळे जातींमध्ये आगी लावून राज्य करणाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडा.

सरकार जनतेचे कुटुंब फोडतेय

निवडणुका तोंडावर असल्यामुळे सध्या विविध योजनांची बरसात होत आहे. मुलींना मोफत शिक्षण, ठीक आहे. मुलांनाही शिक्षण मोफत करा ना! बहीण-भावात वाद निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. लाडकी बहीण योजना… स्वागतच आहे. लाडका भाऊ योजना पण आणा. पण अशा योजना आणून सरकार जनतेचे पुटुंब पह्डत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दाखवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराज स्वतःसाठी नाही, तर रयतेसाठी लढले. हे विसरून आपण मतांसाठी लाचारी पत्करणार असू, तर मग महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

घराघरात जा, मिंध्यांच्या फसव्या योजनांचा भंडाफोड करा

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाले नाही, दुसऱया टप्प्यात मिळाले. त्यानंतर शिवसेनेचा प्रचार सुरू झाला. पण आता मशालीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे मशाल घेऊन घराघरात, गावागावात जा. जिथे मिंधे सरकारचे पाप, अन्याय असेल तिथे जागृती करा. सरकारच्या फसव्या योजनांचा भंडापह्ड करा. लोकांसमोर सत्य आणा आणि यांची पापं जाळून टाका, असे जोरदार आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडी सरकार असताना छत्रपती संभाजीनगरातील गुंठेवारी, समांतर जलवाहिनी, रस्ते, उद्यान अशी कामे आपण मार्गी लावली. तरीही लोकसभेत आपण पुठे कमी पडलो, आमचे काय चुकले, हे लोकांना विचारा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

चोरून विजय मिळवलात

गद्दारांनी पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, तरीही ‘मशाल’ हाती घेऊन शिवसेनेने विजय मिळवला. जिंपून दाखवले. शिवसेनेच्या बाबतीत जो खेळ केला, तोच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही केला. त्यांचेही पक्ष, चिन्ह देऊन टाकले. हिंदुहृदयसम्राटांचा फोटो लावायचा, धनुष्यबाण लावायचा आणि लोकांना फसवून निवडून यायचे! शरद पवारांनी न्यायालयात जाऊन त्यांचा फोटो लावण्यास बंदी केली. शिवसेनेसोबत पुन्हा भाजपने खेळ केला. शिवसेनाप्रमुखांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र पुणालाही वापरता येते. तेव्हापासूनच यांचे कटकारस्थान सुरू होते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मी काढलेला माझ्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही विजय मिळवलात, थोडी तरी लाज वाटू द्या, असा जबरदस्त टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आरक्षणासाठी एकत्र या, सर्वमान्य तोडगा काढा!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे स्वागत करण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने एकत्र येऊ शकतो, मग आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र का येऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.

आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यापेक्षा ज्यांचे प्रश्न आहेत, ज्यांच्या मागण्या आहेत, त्यांना बोलवा. मनोज जरांगे पाटील यांना बोलवा, प्रा. लक्ष्मण हाके यांना बोलवा, धनगर समाजालाही बोलवा. त्यांच्यासमोर खरं काय ते सांगा. सर्वमान्य तोडगा काढा. शिवसेनेचा त्याला पहिला पाठिंबा असेल. कशाला पुणाच्या जिवाशी खेळ करताय! असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी ठराव करा… पाठिंबा देतो

‘आरक्षणासाठी जी टक्केवारीची मर्यादा आहे ती वाढवणे राज्य सरकारच्या नव्हे, तर केंद्र सरकार आणि लोकसभेच्या हातात आहे. अजूनही एक आठवडा विधिमंडळाचे अधिवेशन आहे. सरकार आणि सर्व समाजातील नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बसा. तुमचे म्हणणे तिथे मांडा. टक्केवारी वाढवायची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा. शिवसेना पाठिंबा देईल. तो ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा, तिथेही शिवसेना पाठिंबा देईल,’ असे जाहीर आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.